इगतपुरीनामा न्यूज, दि. १७
उद्याचे वकील कौशल्यक्षम बनावे हा उद्दात्त हेतू डोळ्यासमोर ठेऊन ‘युक्तिवाद करण्याच्या क्षमतेचा कौशल्य विकास’ या विषयावर नवजीवन विधी महाविद्यालय, नाशिक आणि स्किलअपच्या संयुक्त विद्यमाने वेबिनारच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय कायदेविषयक परिषद संपन्न झाली. या परिषदेला हजारोच्या संख्येने कायद्याच्या विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. देश -विदेशातील तज्ज्ञांनी या परिषदेत मार्गदर्शन केले. यामध्ये जेराल्ड जोसेफ कमिशनर तथा व्हा. चेअरमन, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, मलेशिया, करोलिना लेव्हिक्स सिनियर ऑफिशियल, युके. ॲड. शिल्पा पवार, ॲड. संदिप शिंदे सिनीअर वकील, मुंबई आदी कायदे तज्ज्ञांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना व पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य प्रा. डॉ. शाहिस्ता इनामदार यांनी केले. वेबिनारचे मुख्य अतिथी जेराल्ड जोसेफ यांनी विद्यार्थ्यांनी मानवी हक्कांचे जतन आणि संवर्धन केले पाहिजे असे मत व्यक्त केले. वकील हा संवेदनशील असायला हवा, त्याचे वर्तन आतून आणि बाहेरून निर्मळ असले पाहिजे, रोबोट सारखे वर्तन हे न्यायव्यवस्थेला कधीही घातकच हे स्पष्ट करताना त्यांनी मानवी हक्कांचे होत असलेले उल्लंघन ही जागतिक समस्या असल्याचे देखील नमूद केले, युक्तिवाद करताना भाषा नेहमी संयमी असली पाहिजे असे मत कॅरोलिना लेवीका यांनी व्यक्त केले. वकील उत्कृष्ट वक्ता पाहिजे, त्याची विषयावर पकड हवी, कोर्टांत सादर होणाऱ्या केसेसचा अभ्यास वेगवेगळ्या पातळीवरून करणे आवश्यक आहे, शिवाय पक्षकाराच्या वकिलाला कधीही कमी लेखू नये, न्याय भूमिकेत राहून युक्तिवाद करणे अधिक महत्त्वाचे ठरते असे प्रतिपादन ॲड. संदिप शिंदे यांनी व्यक्त केले. वकिलाला भाषेचा अडथळा नसतो, त्याला त्याचे म्हणणे व्यवस्थित मांडता आले पाहिजे असे ॲड. शिल्पा पवार यांनी व्यक्त केले.
नवजीवन महाविद्यालयातून उद्याचे ॲड. राम जेठमलानी, हरीश साळवे निर्माण झाले पाहिजे अशी भावना संस्थेचे विश्वस्त सुभाष देशमुख ( बडे सर ) यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कोमल वैद्य यांनी केले. नवजीवन विधी महाविद्यालयात लवकरच कॅम्पस मुलाखती आणि रोजगार मेळावा देखील आयोजित केला जाणार आहे, शिवाय इंटरनॅशनल सर्टिफिकेट कोर्स मध्ये ॲडवोकेसी स्किल्स आणि सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट असे दोन कोर्सेस सुरू होत असल्याची घोषणा प्राचार्य प्रा. डॉ. शाहिस्ता इनामदार यांनी केली.