

इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसह वयोवृद्ध आणि महिलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा नयना गावित यांनी इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील १०१ ठिकाणी सुसज्ज वाचनालय देण्याचे घोषित केले होते. ह्या संकल्पनेनुसार उद्या पहिल्या टप्प्यात २५ ग्रामपंचायतींना सर्व प्रकारच्या पुस्तकांचे कपाट, टेबल, खुर्च्या आदी साहित्य वितरण करण्यात येणार आहे. मुंबई येथील सहाय्यम संस्था, अध्यक्ष प्रदीप हिंगड, सचिव ॲड. संदीप पाटील यांच्या साहाय्याने हा उपक्रम संपन्न होत आहे. उद्या सकाळी ११ वाजता पेगलवाडी येथे ज्ञान अमृत प्रकल्पाअंतर्गत होणाऱ्या ह्या कार्यक्रमात २५ ग्रामपंचायतींना साहित्य वाटप होणार आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होत आहे.