
इगतपुरीनामा न्यूज, दि. १२
महाराष्ट्र शासनाने पवित्र पोर्टलद्वारे मागील वर्षी झालेल्या शिक्षकभरतीमधील शिक्षणसेवकांचे येत्या तीन आठवड्यात थकित वेतन द्यावे. त्यांना वैद्यकीय सुविधा मिळाव्या. शिक्षणसेवकांचे वेतन पथकाकडे प्रलंबित असलेले शालार्थ आयडी सक्रिय करावे अशी मागणी डी. एड, बी. एड, स्टुडन्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य संघटनेने केली आहे. शिक्षण संचालक कार्यालय, पुणे आणि विभागीय उपसंचालक कार्यालय, नाशिक यांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.
मागण्या पूर्ण न झाल्यास संघटना राज्यव्यापी बेमुदत आंदोलन हाती घेईल असाही इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, नाशिक, अहमदनगरसह राज्यातील सर्वच जिल्ह्यात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर शिक्षकांची नियुक्ती करून भरतीचा दुसरा टप्पा पूर्ण केला. त्यानुसार प्रतिमहिना 8 हजार मानधनावर तीन वर्षे काम केल्यावर मग नियमित वेतन लागू होते असा नियम राज्यात आहे. या तुटपुंज्या मानधनावर फेब्रुवारी 2020 पासून नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात नियुक्त झालेले अनेक शिक्षणसेवक थकित वेतनाअभावी कोरोना काळात हलाकीचे जीवन जगत आहे. कोरोना ड्युटी करावी लागत असताना त्यांना विमा कवच नाही की वैद्यकीय सुविधा नाही. हक्काचे वेतन गेल्या 10 ते 11 महिन्यापासून थकित ठेवले आहे. नाशिकमध्ये तर उच्च माध्यमिकला शिकवणाऱ्या शिक्षणसेवकांचा वेतनासाठी आवश्यक असलेला शालार्थ आयडी अधीक्षक वेतन पथक माध्यमिक विभाग यांनी गेल्या चार महिन्यापासून अडवून ठेवला आहे. असे आयडी काढताना चिरीमिरी द्यावी लागते नाही तर काम रोखून ठेवले जाते. अहमदनगर येथील 70 ते 80 शिक्षणसेवकांचे दहा महिन्यापेक्षा अधिकचे वेतन माध्यमिक विभागाने शासनाचा कुठलाच लिखित आदेश नसताना थकून ठेवले आहे.
याला जबाबदार असलेले संचालक कार्यालय, पुणे आणि विभागीय उपसंचालक कार्यालय, नाशिक यांना संघटनेच्या वतीने इशारा देण्यात येतो की येत्या तीन आठवड्यात शिक्षणसेवकांचे थकित वेतन जमा न केल्यास संघटना राज्यव्यापी बेमुदत आंदोलन हाती घेईल आणि या कोरोना काळात वेतनाअभावी शिक्षकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांवर असेल.
निवेदनावर संस्थापक अध्यक्ष संतोष मगर, उपाध्यक्ष संदीप कांबळे, उपाध्यक्षा अर्चना सानप, राज्य सचिव प्रशांत शिंदे, राज्य सरचिटणीस प्रा. राम जाधव, राज्य संघटक प्रा. वैभव फटांगरे, राज्य कार्यकारणी सदस्य प्रा. वैभव गरड, तुषार देशमुख आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. ह्या आंदोलनाला ‘अखिल महाराष्ट्रीय नेट, सेट, बी. एड, डी. एड पात्रता धारक संघटना, महाराष्ट्र राज्य, ‘रयत सेवक मित्र मंडळ सातारा’, पवित्र पोर्टल असोसिएशन, म. न. पा. पुणे आदी संघटनेने पाठिंबा दर्शविला आहे.
इगतपुरीनामा वेब पोर्टल
सामाजिक, शैक्षणिक प्रश्नासाठी अग्रक्रमाने न्यायाची भूमिका मांडत आहे..
आपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !