घोटी शहरात महिलेचे मंगळसूत्र ओरबाडून अज्ञात चोरटे पसार : चोरीबाबत घोटी पोलिसांत तक्रार दाखल

इगतपुरीनामा न्यूज, दि. १

घोटी शहरातील संभाजी नगर येथे देवदर्शनाला जात असतांना एका महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसुत्र मोटार सायकलवरुन आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी ओरबाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी महिलेने आरडाओरड केली. मात्र चोरटे पळुन जाण्यात यशस्वी झाले असुन याबाबत घोटी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी की, घोटी शहरातील संभाजी नगर येथील महिला अश्विनी पंकज जाधव, वय ३० या नेहमी प्रमाणे २९ एप्रिलला सकाळी साडेआठच्या सुमारास घराजवळच शंभर मीटर लांब उंबराच्या झाडाखाली असलेल्या छोटेखानी शंकराचे पिंडीचे मंदिरात दर्शनाला गेल्या. नेहमीप्रमाणे या मंदिरात देव दर्शन घेऊन घरी परतत असतांना लाल काळे रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून दोन अनोळखी इसम या महिलेजवळ मोटार सायकल हळु चालवत आले. काही कळायच्या आत या महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची ( किंमत ५० हजार ) सोन्याचे मंगळसुत्र असलेली पट्टीपोत मोटार सायकलवर मागे बसलेल्या इसमाने बळजबरीने हिसकावुन घेऊन मोटार सायकलवरून पळुन गेले.

याबाबत अश्विनी पंकज जाधव यांनी घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असुन या फिर्यादीत म्हटले आहे की, लाल काळे पल्सर मोटार सायकलवर पुढे बसलेल्या इसमाच्या अंगात काळे रंगाचा शर्ट, निळी जीन्स पँट घातलेली होती. तर मागे बसलेल्या इसमाच्या अंगात आकाशी रंगाचे शर्ट, काळ्या रंगाची पँट व डोक्यात लाल रंगाची टोपी घातलेली होती. या दोघा अज्ञात चोरट्यांनी माझ्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र बळजबरीने हिसकावुन नेले असल्याची फिर्याद दिली. या महिलेचे पती पंकज जाधव मुंबईला फिल्म इंडस्ट्रीत कामाला असुन त्यांना घटनेची माहिती समजल्यावर त्यांनी पत्नी समवेत १ मे रोजी घोटी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात मोटार सायकलस्वार विरोधात फिर्याद दिली. या दोन अज्ञात मोटार सायकलस्वाराबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!