लेखन : भास्कर सोनवणे, मुख्य संपादक इगतपुरीनामा
सेवाकार्य आणि मानवता ह्या दोन्ही गुणांची अलौकिक देणगी लाभलेले मोडाळे येथील स्व. डॉ. त्र्यंबक काळूजी शेंडगे हे इगतपुरी तालुक्यातील आदिवासी जनतेच्या हृदयात आहेत. गेली ३० वर्ष धीरोदत्तपणे मोडाळे, शिरसाठे आणि कुशेगाव भागातील लोकांच्या सेवेला वाहून घेण्याचे कार्य त्यांनी अखेरपर्यंत केले. अहोरात्र वैद्यकीय सेवा देतांना लोकांना आधार देऊन उभे करण्याचा त्यांचा वसा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. अतिदुर्गम दऱ्याखोऱ्यातील जनतेसाठी जीवनाचा प्रत्येक क्षण फक्त सेवाकार्य करणारे स्व. डॉ. त्र्यंबक शेंडगे हे देवदूत व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाही. मात्र त्यांनी उभे केलेले कार्य आणि लोकांच्या हृदयात मिळवलेले अबाधित स्थान डॉ. शेंडगे आपल्यात चिरंतन असल्याची प्रचिती दिल्याशिवाय राहत नाही. ग्रामीण आदिवासी भागात ३० वर्षाची खडतर तपश्चर्या करणारे स्व. डॉ. त्र्यंबक शेंडगे इगतपुरी तालुक्यात चिरस्मरणीय आहेत.
गोरगरीब आणि सामान्य नागरिकांना अपुऱ्या वैद्यकीय सेवांमुळे मरण पत्करावे लागते. अनेकांच्या वैद्यकीय ज्ञानाचा गरीब नागरिकांना काहीही फायदा होत नाही. शहरी भागात डॉक्टरकी करून पैशांच्या मागे धावणारे लोक आहेत. अशा बिकट काळात १९९१ च्या दरम्यान सेवाकार्याची धगधगती मशाल घेऊन डॉ. त्र्यंबक शेंडगे मोडाळे भागात आले. ह्या अतिदुर्गम जंगली भागातील नागरिकांचे आयुष्य आणि लोकांच्या जगण्याची शोकांतिका त्यांना बदलून टाकायची होती. कधीही परत न जाण्यासाठी त्यांनी मोडाळे परिसराची निवड केली. दरिद्री अवस्थेतील सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांनी आरोग्याच्या विविध सोयी उपलब्ध करून दिल्या. नाममात्र दरात लोकांच्या असाध्य आणि लहानसहान आजारांवर उपचार केले. पैशांसाठी कोणावरील उपचार थांबवला नाही. मिळालेल्या पैशांतून अर्धपोटी आणि उपाशी झोपणाऱ्या अनेक कुटुंबांच्या मुखात त्यांनी मायेने अन्न भरवले. मांत्रिकांचा सुकाळ असणाऱ्या काळात लोकांना विश्वास देऊन निरामय करण्याचे त्यांचे व्रत होते. अनेक अडचणींचा डोंगर पार करून हे सेवा व्रत त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जपले.
गोरगरीब आदिवासी आणि सामान्य नागरिकांची सेवा करण्यासाठी मोडाळे, शिरसाठे, कुशेगाव ह्या भागाची त्यांनी निवड केली. ह्या जंगली भागात सेवा देता देता डॉ. त्र्यंबक शेंडगे ह्या भागाशी एकरूप होऊन गेले. इथल्या माणसांना, लेकरांना, वंचितांना आणि कष्टकऱ्यांना प्रचंड लळा लागलेला हा माणूस ह्या भागाचा देवदूत होऊन गेला. आपली पत्नी, मुले, मुली यांच्यावर सुसंस्कार करून त्यांच्यातही माणुसकीच्या संवेदना त्यांनी जागृत केल्या. तळमळीने ह्या भागातील नागरिकांना केंद्रीभूत ठेवून नियमित सामाजिक कार्य करा असे ते नेहमी म्हणत. ३० वर्षाच्या दीर्घ कालखंडात त्यांनी उभ्या केलेल्या कार्याचा हिमालय सर्वांसमोर आहे. डॉ. त्र्यंबक शेंडगे हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आज आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांचा वारसा मुलगा संदीप त्र्यंबक शेंडगे, दै. पुण्यनगरी तालुका प्रतिनिधी पत्रकार विकास शेंडगे, मुलगी जयश्री धात्रक, नितीन शेंडगे यांच्याकडून पुढे चालवला जात आहे. स्व. डॉ. त्र्यंबक शेंडगे यांचा दशक्रिया विधी मोडाळे येथे उद्या सकाळी ८ वाजता होणार आहे. आयुष्यभर लोकांची सेवा करणारे स्व. डॉ. त्र्यंबक शेंडगे यांना भावपूर्ण आदरांजली..!