अर्धवट जळालेला मृतदेह नाशिकच्या युवकाचा : घोटी पोलिसांच्या वेगवान तपासाला यश

इगतपुरीनामा न्यूज, दि. २८

इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरणाजवळ दोन दिवसांपूर्वी अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृत व्यक्तीची ओळख पटली आहे. तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा खून केल्यानंतर धारगावजवळ वैतरणा धरण परिसरात त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी अज्ञात संशयितांनी हे कृत्य केल्यामुळे अज्ञात संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे. घोटी पोलिसांनी २ दिवसात कसून तपास केला असून संशयित आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाणार आहे.

अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह उजोद्धीन अफजल खान वय २३ रा. वडाळा परिसर नाशिक यांचा आहे. ओळख पटल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला. संबंधित मृत युवक एका मोठ्या गुन्ह्यातील आरोपी असल्याने नाशिक शहरातील एका पोलीस स्टेशनचे पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र तो हाती येण्यापूर्वीच अज्ञात संशयित आरोपींनी त्याचा नाशिक शहरात तीक्ष्ण हत्याराने खून केला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी संबंधितांनी त्याच्या मृतदेहाला इगतपुरी तालुक्यात वैतरणा धरणाजवळ आणून जाळण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांपूर्वी अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने घोटी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. दोन दिवसांच्या आतच घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह तपास केला. यामुळे नागरिकांनी घोटी पोलिसांचे कौतुक केले आहे. लवकरच संशयित आरोपींना चतुर्भुज करण्यात येणार असल्याचे समजते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!