“ध्येयापुढती गगन ठेंगणे” – सर्वोच्च ध्येय गाठवण्यासाठी अखंड परिश्रम करणारा संदीप डावखर : अल्पकाळात मिळवली डॉक्टरेट, वकिली आणि उच्च शिक्षणाची गुरुकिल्ली

लेखन : भास्कर सोनवणे, मुख्य संपादक इगतपुरीनामा

कोणत्याही संकटकालीन परिस्थितीला सामोरे जात अनंत अडचणींच्या उरावर बसून यशाचा राजमार्ग मिळवणे ही अजिबातच सोपी गोष्ट नाही. स्पर्धात्मक जीवनाशी दोन हात करतांना मनातले ध्येय उराशी बाळगून ते ध्येय गाठण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करणाऱ्यांची संख्या सुद्धा कमी आहे. यासह उत्तुंग स्वप्नांचे पूर्णत्व साध्य करतांना जनसेवेचा वारसा जपणे सुद्धा दिव्य असते. ही सगळी किमया इगतपुरी तालुक्यातील गिरणारे ह्या गावातील ॲड. संदीप बाबूलाल डावखर याने करून दाखवली आहे. अवघे २९ वर्ष वय असणाऱ्या संदीप डावखरने अल्पकाळात मिळवलेले यश आणि शैक्षणिक समृद्धी अनेकांच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहता पाहता संदीप डावखर यांच्या ध्येयापुढे व्यापक आकाश सुद्धा ठेंगणे पडले अशी त्यांची महती आहे.

गिरणारे ह्या गावातील सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील ॲड. संदीप बाबूलाल डावखर ह्या युवकाने केलेला प्रेरणादायी प्रवास अनेकांसाठी दीपस्तंभ ठरला आहे. वडिलांची रेल्वेची नोकरी, कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी गृहिणी असणारी आई, बी. एससी झालेली उच्च शिक्षित पत्नी, ३ वर्षांचा मुलगा आणि २ बहिणींसह १ लहान भाऊ असा त्यांचा छोटेखानी परिवार आहे. सज्ञान झाल्यानंतर कुटुंबातील बऱ्याच जबाबदाऱ्यांचे ओझे संदीपवर पडले. उच्च ध्येय आणि उच्च शिक्षणाच्या जोरावर आपल्या पिढीत अभूतपूर्व कामगिरी घडवण्याची जिद्ध मात्र लहानपणापासूनच मनात अंकुरत होती. त्यानुसार शैक्षणिक स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी संदीपने जीवापाड मेहनत घेतली. अनंत अडचणींवर मात करून बीएमध्ये अर्थशास्त्र प्रथम श्रेणी मिळवली. यानंतर एमबीए, एचआर आदी शिक्षण नाशिकच्या बीवायके महाविद्यालयात घेतले. मुंबईच्या एअर इंडियामध्ये २ वर्ष असिस्टंट एचआरमध्ये नोकरी सुद्धा केली. हा सगळा प्रवास करतांना परिस्थितीची तमा न बाळगता ध्येयसिद्धी करण्यासाठी खऱ्या अर्थाने कुवतीपेक्षा जास्त परिश्रम घेतले. ह्यामुळेच संदीपने केलेल्या कामगिरीला अनन्यसाधारण महत्व आहे. संदीप डावखर यांचे आजोबा तथा माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दनमामा माळी, मामा तथा मनसेचे नेते मूलचंद भगत यांच्या मार्गदर्शनाने लोकांच्या मनातल्या परमेश्वराला आनंदी करण्यासाठी संदीपच्या राजकीय जीवनाचा श्रीगणेशा झाला.

राजकारणातुन समाजसेवेचे व्रत करतांना नाशिकच्या मविप्र विधी महाविद्यालयातुन संदीपने एलएलबी शिक्षण पूर्ण केले. आई आणि वडिलांच्या दोन्ही पिढ्यांमध्ये पहिला वकील होण्याचा अविस्मरणीय क्षण संदीप डावखर याने सर्वांना दाखवला. आईवडिलांसह नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या सर्वोच्च आनंदाचा क्षण हा पाहतांना सर्वांचे डोळे आनंदाच्या अश्रूंनी भिजले होते. काही दिवसातच इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांच्या स्वीय सहाय्यकपदाची मोठी जबाबदारी संदीप डावखर यांच्यावर टाकण्यात आली. ह्या माध्यमातून दोन्ही तालुक्यातील सामान्य जनतेच्या हृदयातील ताईत म्हणून संदीप डावखर सुप्रसिद्ध झालेला आहे. लोकांचे प्रश्न, समस्या, विकासकामे करण्यासाठी संदीपने दिलेले योगदान लोकांसाठी कौतुकास्पद ठरलेले आहे. ह्या सर्व कार्याची दखल घेऊन दिल्लीच्या अन्याय निवारण समितीने ॲड. संदीप डावखर यांची संघटनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. संदीप डावखर यांच्या कार्याचा आलेख मागे वळून पाहतांना त्याने नुकतीच पीएचडी इकॉनॉमिक्स पूर्ण करून डॉक्टरेट सुद्धा मिळवली आहे. सर्व अभिमानास्पद कामगिरी करतांना जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, मनसे नेते संदीप किर्वे, पिके डेव्हलपमेंटचे प्रशांत कडू यांचे अनमोल मार्गदर्शन त्यांना लाभले. यामुळेच ॲड. संदीप बाबूलाल डावखर यांच्या प्रेरणादायी प्रवासाचा दीपस्तंभ इगतपुरी तालुक्यातील युवकांसाठी अखंड प्रेरणास्रोत ठरला आहे असे म्हणावे लागेल.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!