अखेरच्या श्वासापर्यंत संस्कार, अध्यात्म आणि जनसेवा करणारे देवतुल्य व्यक्तिमत्व स्व. रामभाऊ बाबा आघाण

लेखन - हभप जालिंदर महाराज रेरे, कीर्तनकार, खैरगाव
देविदास भगवंता हिंदोळे, प्राथ. शिक्षक पिंपळगाव भटाटा

ज्या मातीमध्ये जन्म घेऊन जगणे शिकलो ती पावन माती, जन्म देणारी माता आणि आपला समाज ह्या त्रिसूत्रीला विसरू नये. कृतज्ञतेची कास धरून जनतेच्या हृदयातील परम परमात्मा पांडुरंग परमेश्वर प्रसन्न होईल असे नित्य कार्य करीत राहावे. अशा प्रकारची शेकडो नीतिमूल्ये ज्यांच्या धमन्यांमध्ये वाहत होती असे पूजनीय वैकुंठवासी हभप रामभाऊ बाबा आघाण इगतपुरी तालुक्यात सुप्रसिद्ध आहेत. स्व. रामभाऊ बाबांच्या माध्यमातून भक्तीचा संगम आणि भक्ती करण्याचा सोपा राजमार्ग अनेकांना मिळाला. त्यातून खऱ्या अर्थाने परमेश्वरी विचारांचे अनेक व्यक्तिमत्व निर्माण झाले. गरिबीचे चटके सोसून आपल्या कुटुंबात शिक्षणाची आवड निर्माण केली. जनसेवेचा वसा म्हणजे देवाची सेवा असा विचार पेरून विठ्ठल आणि मारुती ह्या दोघा सुपुत्रांना जनसेवेत तत्पर केले. समाजबांधवांसाठी निष्णात कायदेतज्ज्ञ असावा म्हणून मारुती या मुलाला वकील बनवले. ह्याच पुण्याईच्या जोरावर विठ्ठल एअर इंडियाच्या सेवेत तर मारुती हा खैरगाव येथील लोकनियुक्त सरपंच म्हणून गावाची सेवा करीत आहे. वैकुंठवासी हभप रामभाऊ बाबा आघाण वर्षभरापूर्वी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी विलीन झाले. अशा देवतुल्य व्यक्तिमत्वाच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शब्दांजली अर्पण करतांना मन मात्र भरून येत आहे.

स्व. रामभाऊ बाबा नेहमी म्हणायचे की, असं काहीतरी मिळवा की जे ‘कायमस्वरूपी’ राहणार असेल.
ऐसे का हो न करा काही | पुढे नाही नास ज्या ||
विश्वंभरा शरणागत | भूतजात वंदूनि ||
आपण जे काही सर्व करतो त्या सर्व गोष्टीचा नाशच ठरलेला आहे. एकच गोष्ट आहे ती म्हणजे “अविनाशी परमात्मा” त्याच्यासारखा अविनाशी जगात कोणी नाही म्हणून तर तो “सत्य” आहे. संसारातल्या वस्तूंचा छंद मनाला लावून घेण्यापेक्षा ‘परमात्म्याचा छंद’ मनाला लावावा, म्हणजे तो परमात्मा जर प्राप्त झाला तर आपलं ‘प्राप्तव्य चिरंतन’ राहील, जे भविष्यात कधीच संपणार नाही. संसारातल्या वस्तू संपून जाणाऱ्या आहेत. ‘परमात्मा’ कधीच न संपणारा आहे. हे जीवा तू तुझ्या मनाला गोविंदाचे पिसे लावून घे, म्हणजे काय होईल, तो ‘गोविंद’ स्वतः ‘अविनाशी’ आहे तो तुलाही अविनाशी करून टाकील. अविनाश करी आपुलीया ऐसे | लावी मना पिसे गोविंदाचे ||

सर्वसामान्य आदिवासी कुटुंबात जन्माला आलेले वैकुंठवासी हभप रामभाऊ बाबा आघाण यांच्याकडे जगावे कसे आणि कोणासाठी ? याचा साक्षात प्रचिती आणणारा मूलमंत्र होता. त्यांच्या कुटुंबांमध्ये अध्यात्माची कुठलीही पार्श्वभूमी नसताना सतत वैष्णवांच्या संगतीत राहून आणि सद्गुरू सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा व संत एकनाथ बाबा चव्हाण मास्तर यांच्या सानिध्यात राहून त्यांनी नित्य नामसाधना केली. त्याद्वारे त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजसेवा आणि अध्यात्मसेवेसाठी समर्पित केले. परखड भाषा आणि स्पष्टवक्तेपणा ह्या स्वभावगुणांमुळे अनेक साधकांना घडविण्यात बाबांचा मोलाचा वाटा आहे. कीर्तन-प्रवचनाचे माध्यम न वापरता सहज चालता-बोलता परमार्थाचे गुढ सिद्धांत सांगून सर्वसामान्य जीवांना साधक होण्यास त्यांनी प्रवृत्त केले. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. ह्या माध्यमातून त्यांनी केलेल्या बहुमोल मार्गदर्शनाने अनेकांच्या जीवनाचे सोने झाले असे म्हणायला हरकत नाही.

स्वर्गीय हभप रामभाऊ बाबा आघाण हे अध्यात्म, प्रपंच, समाजसेवा, नेतृत्व, स्पष्टोक्ता, संघटक, अभ्यासक, विश्लेषक ह्या आठ गुणांनी संपन्न असलेले जेष्ठ समाजसेवक होते. आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळ नाशिकचे संस्थापक सदस्य म्हणून काम करतांना समाजसेवक तथा जिल्हाध्यक्ष कै. यशवंत ठमा आगिवले. जिल्हा सल्लागार कै. भगवंता ( भवानी ) तांबडू हिंदोळे, जेष्ठ समाजसेवक कै. सोमा कामडी यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केले. समाज संघटन करून संघटनेच्या शाखा गावोगावी स्थापन करणे, समाजावरील अन्यायाला वाचा फोडणे आणि समाजाची जागरूकता वाढवण्यासाठी त्यांनी केलेले काम अविस्मरणीय आहे. इगतपुरी तालुक्यात पांडुरंग गांगड, काशिनाथ मेंगाळ यांना ठाकूर समाजाचे आमदार आणि समाजसेवक कै. यशवंत आगीवले जिल्हा परिषद सदस्य करण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे. पत्नी गं.भा. नवसाबाई, मुलगा विठ्ठल, ॲड. मारुती, मुली सौ. सिताबाई, सौ. वनिता, सूना सौ. भोराबाई, सौ. अनिता, नातवंडे कु. नताशा, कु. आकाश, कु. देवांश ह्या सर्वांना घडवून त्यांना सुसंस्कारित केले. त्यांनी केलेल्या कार्याचा जेवढा उल्लेख केला तेवढा कमीच आहे. स्वतः कोणत्याही पदाची लालसा न बाळगता समाज बांधवांना मोठ्या पदावर विराजमान करणारे स्वर्गीय हभप रामभाऊ बाबा आघाण यांच्या जाण्याने सर्वांची मोठी हानी झालेली आहे. गुरुतुल्य मार्गदर्शक, निष्ठावान वारकरी, ब्रम्हमुर्ती स्वर्गीय रामभाऊ बाबा आघाण यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन..!

आज माझ्या आयुष्याचा वृक्ष आनंदाने डोलतोय तो त्यांनी दिलेल्या योग्य मशागतीमुळे. कारण माझ्या आयुष्याच्या वृक्षाची पाळेमुळे चांगल्या संस्कारांच्या मातीत रूजलेली आहेत. योग्य गुणांनी, कलांची बांधणी व अयोग्याची छाननी केली ते माझे आबा. घामाच्या धारांनी काळ्या आईच्या उदरातून सोनं पिकविणारे माझे आबा. ज्यांनी खूप कष्टाने व जिद्दीने तसेच आबा दुसऱ्यांच्या घरी गडी राहून घर सांभाळून आम्हाला घडविले. त्यानंतर खरेदी विक्री संघ घोटी बुद्रुक मध्ये 30-35 वर्ष काम केलं. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी आज यशाची प्रत्येक पायरी चढत आहे. 
- ॲड. मारुती रामभाऊ आघाण, लोकनियुक्त सरपंच खैरगाव

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!