इगतपुरीनामा न्यूज, दि. १०
छत्रपती शिवरायांचे विचार दगडालाही मोती बनवु शकतात. ह्या विचारांच्या सुसंस्कारांची पेरणी प्रत्येक माणसात व्हावी. शिवरायांच्या विचारांसह सामाजिक कार्याचा ठसा उमटवावा. यासाठी इगतपुरी तालुक्यातील रुपेश हरिश्चंद्र नाठे हा ध्येयवेडा युवक झपाटून काम करीत आहे. संपूर्ण कुटुंब आणि सहकारी मित्रांसह कामाला झोकून घेतलेल्या ह्या युवकाच्या प्रेरणादायी कार्याची दखल आशिया खंड स्तरावरील संघटनेने घेतली आहे. रुपेश हरिश्चंद्र नाठे यांना एशियन एज्युकेशनतर्फे इमर्जिंग सोशल वर्क लिडर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रुपेश हरिश्चंद्र नाठे यांना मिळालेल्या ह्या मानाच्या पुरस्काराने पहिल्यांदाच इगतपुरी तालुक्याची नवी ओळख निर्माण झाली आहे.
इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील शेतकरी आणि समाजसेवा करणाऱ्या नाठे कुटुंबातील रुपेश नाठे हे वैद्यकीय क्षेत्रात काम करतात. यासह हिंदवी स्वराज्य ग्रुपच्या माध्यमातून परिश्रम करणाऱ्या युवकांचे संघटन त्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरीत होऊन रुपेश आणि त्याचे सहकारी युवक सामाजिक कार्यात आघाडीवर आहेत. शिवरायांच्या विचारांचे निव्वळ वाचन न करता हे विचार कृतीत यावेत यासाठी रुपेशची सातत्याने धडपड असते. समाजातील उपेक्षितांच्या प्रश्नांच्या सोडवण्यासाठी रुपेश नेहमीच संवेदनशील असतो.
महामारीच्या काळात गरजु रुग्णांना खाटा, ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी रुपेश आणि सहकाऱ्यांनी जीवाचे रान केले. ऑक्सिजन कमी पडू नये म्हणुन ऑक्सिजन सिलेंडर स्वखर्चाने लोकांसाठी दान केले. लॉकडाऊन काळात उपासमारी सोसणाऱ्या गोरगरिबांना अन्नदान केले. त्यांची समाजसेवेची सुरवात शालेय वयात झाली. स्वतःच्या जन्मदिनाला अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांसोबत राहून त्यांना मदत करण्याचे त्यांचे व्रत आहे. यासह त्यांनी विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध आमदार, खासदार, विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांच्या भेटी घेऊन त्यांच्यापर्यंत प्रश्न पोहोचवले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घराघरात पोहचवण्यासाठी त्यांनी भारतात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज पालखी सोहळ्याचे महाराजांचा सहवास लाभलेल्या विश्राम गडावरुन आयोजन केले. हाती घेतलेले प्रत्येक काम पूर्ण झाल्याशिवाय स्वस्थ बसत नसलेला ध्येयवेडा युवक रुपेश हरिश्चंद्र नाठे याची जिल्हाभर ओळख आहे. आशिया खंडातील प्रतिष्ठित संस्थेने रुपेशच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन एशियन एज्युकेशनतर्फे इमर्जिंग सोशल वर्क लिडर पुरस्कार देऊन गौरव केला. विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी रुपेश नाठे यांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.