इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
इगतपुरी तालुक्यातील नांदगांवसदो हे मोठे गाव गेल्या आठवड्यापासून अंधारात आहे. वीज गायब असल्याने येथील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुंबई आग्रा महामार्गापासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या या गावात वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याचा लोकांचा आरोप आहे. सध्या तीव्र स्वरूपाचा उन्हाळा सुरू असुन तापमानाचा पारा 40 च्या पुढे गेला असल्याने नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. लाईटच नसल्याने पंखे, कुलर बंद असल्याने वयोवृद्ध व लहान मुलांना उष्माघाताचा धोका वाढला आहे. मोबाईल चार्जिंगसाठी शहराकडे यावे लागते आहे. ह्या गावातील विजेचा प्रश्न तातडीने सोडवावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
सध्याच्या परिस्थितीत ऊन वाढल्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत असुन बरेच नागरिकांचे आरोग्य या तापमानाने बिघडले आहे. नांदगाव सदो येथील नागरिक गेल्या आठ दिवसांपासुन लाईटच्या प्रतिक्षेत आहेत. विशेष म्हणजे विद्युत पुरवठा लवकर सुरू करावा यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रार करूनही विज वितरणचे अधिकारी या मागणीकडे कानाडोळा करत असल्याने अधिकाऱ्यांविराेधात ऊद्रेक होऊ शकतो. म्हणुन वीज वितरण कंपनीने वेळीच नांदगावसदाे येथील विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.