डोंगरातील गुहेत जागृत स्वयंभू आई चौराई मातेचे नैसर्गिक मंदिर : नवसाला पावणारी धानोशीची देवी चौराई माता

सह्याद्रीच्या कुशीत नाशिक व नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर  धानोशी ठोकळवाडी ह्या गावी डोंगरातील गुहेत जागृत स्वयंभू  आई चौराई मातेचे नैसर्गिक मंदिर आहे. जे एकमेव देवस्थान असेल जेथे गुहेत उंच डोंगराच्या पोटी बारमाही पाणी असलेली गुहा आहे हे विशेष..!  मंदिरात जाण्यासाठी टाकेद परिसरातील धानोशी गावातून थेट डोंगर चढून वर जावे लागते. धानोशी ठोकळवाडी गावची ग्रामदैवत असलेली चौराई माता नवसाला पावते अशी पिढ्यानपिढ्या भाविकांची श्रद्धा आहे. देवीसमोर वाघोबा आहे. अनेक देव्यांचे वास्तव्य डोंगरावर आहे त्याचप्रणे आई चौराई डोंगरावर आहे.

चैत्र महिन्यात देवीची मोठी यात्रा धानोशी ग्रामस्थ करतात. गावातून देवीच्या काठीची भव्य मिरवणूक काढली जाते. ही काठी डोंगरावर नेऊन मंदिरात ध्वज रोवला जातो. आई चौराई ही कळमजा देवीचे मूळ रूप आहे. वर्षानुवर्षे ग्रामस्थांच्या मनोकामना व संकटे दूर करणारी व नवसाला पावणारी म्हणून येथे अनेक भाविक नवस घेतात .देवीच्या नावावरूनच या डोंगराला चौराईचा डोंगर म्हणतात. याच डोंगराच्या बाजूने व मधून म्हैसवळण घाट गेला आहे. जो नाशिक व नगर जिल्ह्याला जोडतो. पिढ्यानपिढ्या पासून लोहकरे कुटुंब देवीचे पुजारी आहेत .

नवरात्रीत येथे धानोशी ग्रामस्थ व पुजारी देवीचे भगत येथे घटस्थापना करतात. देवस्थान वनविभागाच्या हद्दीत असल्याने  देवस्थानचा विकास  झालेला नाही. परंतु श्रमदान व लोकवर्गणीतून धानोशी ग्रामस्थांनी पत्राचे शेड व समोरील जाळी लावून काम केले आहे.  वन पर्यटन तीर्थक्षेत्रात या ठिकाणाचा समावेश करण्यात यावा अशी ग्रामस्थ व भाविकांची मागणी आहे. नवरात्रीत भाविक देवीच्या दर्शनासाठी चालीवर राहतात. ह्या जागृत देवस्थानाला परिसरातील व बाहेरगावचे अनेक श्रद्धाळू भाविक दर्शनासाठी येतात. आपणही अवश्य भेट देऊन दर्शन घ्यायला जावे असे हे जागरूक ठिकाण आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!