लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २१
प्रत्येकाचे आरोग्य चांगले रहावे ही जबाबदारी त्या गावच्या पुढाऱ्यांची आहे. जगी कीर्ती व्हावी या उक्तीप्रमाणे प्रतिष्ठा मिळावी यासाठी लोक कीर्तन करू लागले आहेत. नुसते कीर्तन न करता परमेश्वराची भक्ती देखील करावी असे आवाहन जगतगुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास लहवितकर महाराज यांनी केले. नाशिक तालुक्यातील वंजारवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहात काल्याच्या किर्तनरुपी सेवेत शेवटचे पुष्प गुंफताना ते बोलत होते.
वंजारवाडी गावाने पन्नास वर्षांची परंपरा जपली असून गेल्या सात दिवसांपासून नामवंत किर्तनकारांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यासह दररोज विठू नामाच्या गजरात काकडा भजन हरिपाठ देखील झाले. या माध्यमातून अनेक वारकरी देखील घडले आहेत. सप्ताहाच्या सांगतेच्या दिवशी विठ्ठल नामाचा जयघोष करीत टाळ मृदुंगाच्या गजरात गावातून दिंडी काढण्यात आली. यावेळी महिलांसह बाल गोपाळ सहभागी झाले होते. महाप्रसादाने काल्याच्या कीर्तनाची सांगता झाली. यावेळी आचार्य रामकृष्णदास महाराज लहवीतकर यांच्या हस्ते सरपंच ज्ञानेश्वर शिंदे यांचा तसेच गायक, वादक, विणेकरी, कीर्तनकार यांचा सत्कार करण्यात आला.