इगतपुरीनामा न्यूज, दि १३
इगतपुरी तालुक्यातील त्रिंगलवाडी येथे एका हॉटेलवर पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. पोलिस अधीक्षकांनी केलेल्या या छाप्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील त्रिंगलवाडी येथे हॉटेल माउंटन शाडो रिसॉर्ट या हॉटेलमध्ये हुक्का पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली होती. त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला घेऊन या ठिकाणी छापा टाकला असता हॉटेलमध्ये हुक्का पार्टी सुरू असल्याची बाब समोर आली. त्या ठिकाणी 65 ते 70 जण एकत्र येऊन पार्टी करत असल्याचे समोर आले. यामध्ये वीस ते पंचवीस महिला आणि 50 ते 55 पुरुष असल्याचे प्रथम दर्शनी समोर आले. रात्री दोन वाजता पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी ही कारवाई केली असून याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे