प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. १
स्वयं सहाय्यता महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी मोठी संधी असुन जवळच असलेल्या कारखानदारांनी महिला बचत गटांकडे कच्चा माल पुरवठा होण्याच्या दृष्टीने मागणी केल्यास महिला अधिक सक्षम होतील. कोरोना काळातनिराधार झालेल्या महिलांनाही याचा मोठा फायदा होणार असल्याचे प्रतिपादन इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी केले. ग्रामपंचायत पाडळी देशमुख व कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी शिवण क्लास व ब्युटीपार्लर प्रशिक्षण पाडळी देशमुख येथे आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, कोकण कला व शिक्षण संस्थेच्या समन्वयक प्रतिभा पाटील, अरुण बागडे, पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले, हिरकणी महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा तथा ग्रामपंचायत सदस्या पुष्पांजली प्रल्हाद धांडे,
आदी उपस्थित होते. उमेद अभियान समन्वयक भगवान आवारी, ग्रामसेवक संदिप निरभवणे, सी.आर.पी. सुमन भाऊसाहेब धांडे आदींसह महिला स्वयंसहाय्यता समुहाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा पाटील यांनी केले तर उपसरपंच बाळासाहेब आमले यांनी आभार मानले.