इगतपुरीनामा न्यूज, दि. 2
2 नोव्हेंबर 1992 मध्ये नागालँड येथे “ऑपरेशन रक्षक” मध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत इगतपुरी तालुक्यातील खैरगाव शिदवाडी येथील जवान राजेंद्र धोंडू भले हे गोळ्या लागून शहीद झाले होते. आज त्यांच्या 30 व्या शहीद दिनानिमित्त तालुक्यातील आजी माजी सैनिक व खैरगाव ग्रामस्थांकडून त्यांच्या स्मारकावर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात शहीद जवानाचे पूजन करून व सैनिक मधुकर जाखेरे, विजय कातोरे, किसन हंबीर, वसंत हिंगे यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार घालून करण्यात आली. शहीद जवान राजेंद्र भले यांच्या वीरमाता सगुणाबाई भले व वीरनारी गंगुबाई भले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रहार सैनिक कल्याण संघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष माजी सैनिक विजय कातोरे यांनी सैनिकांचे महत्व सांगितले. सैनिकांचा नेहमी आदर झाला पाहिजे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाप्रसंगी खैरगावचे सरपंच ॲड. मारुती आघाण, लोकेश कटारिया, वसंत हिंगे, शिवाजी शिंदे, काशिनाथ सावंत, जनक भले, मच्छिंद्र गांगड आदींनी शहीद जवानाला श्रद्धांजली अर्पण केली. गुणाजी गांगड व किसन हंबीर यांनी सर्वांचे आभार मानले.