इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील भावली बुद्रुक येथील १६ वर्ष ९ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेत फूस लावून पळवून नेणारी १ महिला आणि २ पुरुषांवर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही संशयित आरोपी जळगाव जिल्ह्यातील असून संबंधित अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्यात आल्यामुळे मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भादवि कलम ३६३, ३६६ अ, यासह बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम ९ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांच्या तत्परतेने ही घटना प्रकाशात आली. महिला बाल आयोगाच्या राज्य सदस्या सायली पालखेडकर यांनी याबाबत दखल घेतली आहे.
१२ जून ह्या दिवशी घोटी शहरातील १४ नंबर भागात संशयित आरोपी सुरेखा योगेश पाटील रा. कासोदा ता. एरंडोल जि. जळगाव हिने भावली बुद्रुक येथील अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेतला. तिला फूस लावून इगतपुरी आणि नंतर जळगाव येथे घेऊन गेली. संशयित आरोपी योगेश शांताराम पाटील रा. कासोदा ता. एरंडोल जि. जळगाव याच्या समक्ष संशयित आरोपी मनोज राजु शिंपी रा. कासोदा ता. एरंडोल जि. जळगाव याच्यासोबत मुलीचा विवाह लावून दिला. तिन्ही संशयित आरोपी घोटीत आले असल्याचे समजताच मुलीच्या आईने घोटी पोलिसांत फिर्याद दाखल केली. तिन्ही संशयित आरोपी अटक करण्यात आल्याचे समजते. या घटनेत लाखो रुपयांचा व्यवहार झाला असल्याची चर्चा आहे.