इगतपुरीनामा न्यूज, दि. १८
तीर्थक्षेत्रे सर्वांना पूजनीय असली तरी तेथील मंदिरांत जाऊन देव शोधण्यासाठी अनेकजण झपाटून गेलेले असतात. मात्र देव हा दगडात नसून आईवडील हेच खरे दैवत आहे. ह्या दैवतांचे ऋण फेडणे फार अशक्य आहे. आईवडीलांच्या पुण्याईमुळे लाभलेल्या समाजाचेही ऋण फेडण्याचा प्रयत्न म्हणजे आभाळाची उंची गाठणे आहे. सर्वोच्च स्थान असणाऱ्या आपल्या आईवडिलांचे पाद्यपूजन करून ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न इगतपुरी तालुक्यातील साकुर येथील कुकडे परिवार करीत आहे. सोमवारी २१ फेब्रुवारीला बहिरू कुंडलिक कुकडे, उत्तम कुंडलिक कुकडे यांनी आपल्या आईवडिलांच्या सन्मानार्थ मातृपितृ अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रम होणार असून आईवडिलांसाठी विशेषत्वाने होणारा हा कार्यक्रम इगतपुरी तालुक्यात पहिल्यांदाच होत आहे.
साकुर येथील कुंडलिक संतु कुकडे, त्यांची पत्नी भिकुबाई कुंडलिक कुकडे यांना बहिरू आणि उत्तम हे दोघे सुपुत्र आहेत. त्यांना राजूबाई शंकर सहाणे ही विवाहित मुलगी असून नातवंडांसह मोठा कुकडे परिवार आहे. अनेक वर्ष काबाडकष्ट करून कुंडलिक कुकडे यांनी आपल्या कुटुंबावर सुसंस्कार केले. यामुळे कुकडे परिवार अध्यात्मिक आणि सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असतो. यामुळे प्रगतिशील झालेल्या परिवारासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या आईवडिलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी अल्पसा प्रयत्न करण्याचे सर्वांनी निश्चित केले. त्यानुसार गुरुवर्य ब्रम्हविलीन हभप नागोराव महाराज बहाद्दुरे, मठाधिपती गुरुवर्य हभप माधव महाराज घुले यांच्या कृपाशीर्वादाने मातृपितृ अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होणार आहे.
सोमवारी २१ फेब्रुवारीला दुपारी ३ ते ६ पाद्यपूजन, सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत भाषाप्रभू हभप जगन्नाथ महाराज पाटील ( भिवंडी ) यांचे सुश्राव्य किर्तन होईल. गायनाचार्य चंदू महाराज सानप, निवृत्ती महाराज चव्हाण, अशोक महाराज झाडे आणि मृदंगाचार्य किरण महाराज गोसावी कीर्तनाला साथसंगत करणार आहेत. यानंतर महाप्रसादाचा भव्य कार्यक्रम होणार आहे. ह्या अभूतपूर्व कार्यक्रमाची इगतपुरी तालुक्यात चर्चा सुरू असून आईवडिलांची प्रत्यक्षात सेवा करून पुण्याईचा लाभ घेण्यासाठी हा कार्यक्रम लाभदायक ठरणार आहे. प्रसिद्ध कीर्तनकार रामदास महाराज सहाणे, पंढरीनाथ महाराज सहाणे यांनी यशस्वीतेसाठी नियोजन केले आहे. मातापित्यांच्या सेवा कार्यासाठी कार्यक्रमाला भाविक, नातेवाईक आणि हितचिंतकांनी उपस्थित राहावे असे आवाहन खंडेराव संतु कुकडे, भानुदास लक्ष्मण कुकडे, बहिरू कुंडलिक कुकडे, उत्तम कुंडलिक कुकडे, योगेश बहिरू कुकडे, संपत कुकडे, समस्त भजनी मंडळ, युवा भजनी मंडळ आणि समस्त ग्रामस्थ साकुर यांनी केले आहे.