इगतपुरीनामा न्यूज, दि. २१
जानेवारीमध्ये घेतलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीमुळे इगतपुरी येथील महिला डॉक्टरचा मृत्यू झाल्याचे निदान झाले आहे. डॉ. स्नेहल दिलीप लुणावत ( वय 32 ) असे महिला डॉक्टरचे नाव असून ‘एईएफआय’ समितीच्या अहवालानुसार लसीमुळे घटना घडल्याचव नमूद आहे. ह्या घटनेमुळे इगतपुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. लसीचा डोस घेतल्यानंतर तिला त्रास सुरू झाला. लो मायग्रेनचा त्रासातून ती मुक्त होऊन औरंगाबाद ते दिल्ली विमानाने गेली. तिथे दुसऱ्या दिवशी एका हॉस्पिटलमध्ये कॉन्फरन्स होती. पण आदल्या दिवशी दिल्लीत रात्रीच्या वेळी तिची प्राणजोत मालवली होती.
अधिक माहिती अशी की, डॉ. स्नेहल लुणावत या महिला डॉक्टर एका वैद्यकीय महाविद्यालयात दंतचिकित्सा विषयावर अध्यापन करत होत्या. 28 जानेवारी ह्या दिवशी त्यांना कोरोना प्रतिबंधक लस कोरोना योद्धा म्हणून देण्यात आली होती. लस घेतल्यानंतर त्रास सुरू झाल्याने डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. मात्र त्यांची तब्येत त्यानंतरही पुन्हा बिघडली. औरंगाबादच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतांना १ मार्चला त्यांचा मृत्यू झाला. कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुष्परिणामुळेच डॉ. स्नेहल लुणावत यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी राज्य शासनाकडे केला. याप्रकरणी संबंधित लस कंपनीला कळवूनही कंपनीने प्रतिसाद दिला नाही. मात्र लुणावत परिवाराने केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने ‘एईएफआय’ समितीकडून अखेर अहवाल प्राप्त झाला आहे. अहवालात नमूद आहे की, डॉ. स्नेहल लुणावत यांचा मृत्यू म्हणजे ‘सिरिअस ॲडव्हर्स इव्हेंट फॉलोइंग इम्युनायझेशन आहे.’ लसीमुळे हे सगळे घडल्याची नोंद अहवालात नमूद आहे. मात्र, त्या बदल होऊ शकतो, असे अधोरेखित करण्यात आलेले आहे. डॉ. स्नेहल लुणावतचे वडील दिलीप लुणावत औरंगाबाद येथे वास्तव्याला असून मुलीच्या निधनाने त्यांना धक्का बसला आहे.