शिवरायांची आरती करू नका…!

लेखन : विनोद नाठे, शिवचरित्र व्याख्याते, 9890979097

काल एका लग्नाला गेलो होतो. तिथे चक्क छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली ! शिवराय पृथ्वीवरील सर्वोत्तम राजा आहेत देव नाही ! शिवरायांला देव म्हणून त्यांचे महत्त्व कमी करु नका ! त्यांना देव बनवू नका ! त्यांचे दैवती करण करू नका. त्यांचे दैवती करण झाले तर त्यांचा पराक्रम चमत्कार होईल… अन असे झाले तर त्यांचे महत्व कमी होईल. काही लोक मुद्दाम त्यांचे दैवतीकरण करण्याचे मागे लागले आहेत. त्यांच्या कट कारस्थानाला बळी पडू नका. छत्रपती शिवाजी महाराज माणूस होते. माणूसपणाच्या सर्व मर्यादा त्यांना होत्या. त्यांनी मानवी जीवनाला आभाळाची उंची प्राप्त करून दिली. राजे स्वकर्तृत्वावर घडले. त्यांना कोणत्याही चमत्काराने, दैवी ताकदीने पाठबळ दिले नाही किंवा त्यांच्यात कोणती चमत्कारी शक्ती नव्हती. राजे स्वत: अतिशय चारित्र्यसंपन्न, नितिवान, मुत्सदी, पराक्रमी व बुध्दीमान होते.  प्रबोधनकर ठाकरे म्हणतात की, तेहत्तीस कोटी देवांची सुट्टी करणारा राजा म्हणजे शिवाजी राजा. मोगलाईच्या जुलमी काळात सगळे देव मंदिरांच्या गाभाऱ्यातून बाहेर पडले नाहीत किंवा त्यानंतर इंग्रजांच्या राजवटीतही देव बाहेर आले नाहीत. मोघलाईला आव्हान दिले ते छत्रपती शिवाजी राजांनी. त्यानंतर संभाजी राजांनी त्यांचे कंबरडे मोडले. ताराराणींनी तर औरंगजेबाला या मातीत गाडले. या सगळ्या संघर्षात या सर्वांनाच माणूसपणाच्या मर्यादा होत्या. त्यांना कोणतेच दैवी सहाय्य वगैरे झालेले नाही. हे सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ असताना शिवाजी राजांना देव बनवण्याची घाई कशासाठी सुरू आहे ?

शिवाजी राजे माणूसपणाच्या उंचीवर आहेत म्हणून आजही त्यांचे नाव घेताच रक्त सळसळून उठते. प्रचंड प्रेरणेची ताकद निर्माण होते. एक माणूस इतके अफाट शौर्य गाजवू शकतो, हा विचार पराकोटीचे सामर्थ्य देणारा आहे. म्हणूनच शिवाजी महाराजांनी अनेक महापुरूषांना प्रेरणा दिली. लढण्यासाठी, झगडण्यासाठी नैतिक व आत्मिक बळ दिले. स्वत: महाराजांना स्वराज्य उभे करताना अनंत अडचणी आल्या. जर शिवाजी राजे देव असते तर त्या आल्या नसत्या. त्यांनी चमत्काराच्या जोरावर औरंगजेब दिल्लीतच मारला असता. आग्र्याच्या कैदेत महाराजांना खितपत पडावे लागले नसते. ते देव असते तर गुप्त होवून आले असते. आग्र्यातून परत रायगडावर यायला त्यांना दोन-अडीच महिन्याचा जो कालावधी लागला तो लागला नसता. ते तिथे गुप्त होवून थेट रायगडावर प्रगटले असते. कारण शिवाजी महाराजांच्या आयुष्यात एक एक मिनिट लाख मोलाचा होता. त्याचप्रमाणे राजांनी अफजलखान विजापुरातच मारला असता. रयतेच्या संपत्तीची इतकी नासधुस होवू दिली नसती. कारण रयतेच्या भाजीच्या देठाला धक्का लागला तरी कळवळणारा तो राजा होता. विजापुरहून निघालेल्या अफझल खानाने शेतकऱ्यांचे खुपच नुकसान केले. महाराज देव असते तर नक्कीच त्यांनी विजापुरात जावून अफझल खान फाडला असता. महाराजांना रयतेची व मावळ्यांची खुप काळजी होती. ते या सर्वांच्यावर पुत्रवत प्रेम करत होते. तानाजी, बाजी सारखे मावळे त्यांनी गमावले नसते. महाराजांच्याकडे अतिशय तुटपुंजी शस्त्रसामुग्री होती. जर ते देव असते तर महाराजांनी चक्र, धनुष्य किंवा दैवी शस्त्रे वापरली असती. कारण प्रत्येक देवाने त्याच्या चरित्रात अशाप्रकारे पराक्रम, चमत्कार केलेला आहे. अगदी इंद्रानेही दधिची ऋषीच्या हाडापासून बनवलेल्या शस्त्राने वृत्रासुराचा अंत केला म्हणे. कृष्णाने चक्राद्वारे अनेकांचा नाश केला. शंकराने तिसरा डोळा उघडून किंवा तत्सम दैवी ताकदीच्या जोरावर अनेक शत्रू संपवले. हे सर्व पुराणात, ग्रंथात आहे. पण शिवाजी राजांच्या जीवनात त्यांच्याकडे असली कोणती दैवी शक्ती नव्हती. कोणतेच दैवी शस्त्र नव्हते. त्यांना तुटपुंज्या शस्त्र सामग्रीनिशी शत्रूशी लढावे लागले आहे. पराभूत शत्रू सैन्याची शस्त्र सामग्री महाराजांनी ताब्यात घेवून उपयोगात आणली आहे. महाराजांच्या शत्रूकडे तोफा होत्या. पण महाराजांच्याकडे त्या नव्हत्या. महाराज जर देव असते तर त्यांना तोफा तयार करणे फार अवघड नव्हते. ते सहज बनवू शकले असते. इसवी सन एक हजार साली चीनमध्ये पहिली बंदूक बनवण्यात आल्याचे उल्लेख आहेत. महाराज जर देव असते तर त्यांना त्याचवेळी एके छप्पन, फोर्टी सेव्हन बनवता आली असती. एखादे क्षेपणास्त्र बनवता आले असते. अणुबाँब बनवता आला असता. देवाला काय अशक्य असते ? त्यांना आपल्या दैवी सामर्थ्याच्या जोरावर महाराष्ट्रच काय पण जगावर राज्य करता आले असते. महाराज जर शंकराचा अवतार असते तर तिसरा डोळा उघडून अख्खी मोघलाई जाळून खाक केली असती. महाराज जर विष्णूचा अवतार असते तर चक्र चालवून पाची पातशाह्या कापून काढल्या असत्या. महाराजांना त्यांच्या हयातीत संपुर्ण महाराष्ट्र काबिज करता आला नाही. या सगळ्या त्यांच्या माणूसपणाच्या मर्यादा होत्या. भवानी मातेने तलवार दिली वगैरे कथा जाणिवपुर्वक रचल्या गेल्या आहेत. महाराजाच्या पराक्रमाला खुजे करण्याचा हा आटापिटा आहे. जर भवानीमाता तलवार देवू शकते तर तोफा किंवा बंदूका का देत नाही ? महाराजांच्या शत्रूकडे तोफा असताना देवी महाराजांना का देणार नाही ? तलवारीपेक्षा कधीही तोफा व बंदूका ताकदीच्या होत्या. मग तलवारच कशी दिली ? ही सगळी वस्तुस्थिती असताना शिवाजी राजांना भगवान करण्याची गडबड का सुरू आहे ? शिवाजी महाराजांना देव करणे म्हणजे त्यांचा खून करण्यासारखे आहे. महाराजांचा ज्या दिवशी देव होईल त्या दिवशी शिवरायांच्या पराक्रमी चरित्राचा अंत होईल. दैवीकरण झाले की महाराज अनेकांच्या अंगात येतील. त्यांच्या नांवे अनेक भाकड कथा रचल्या जातील. अंगारे, देव्हारे व धुपारे माजवले जातील. शिव चरित्र देव्हाऱ्याच्या तुरूगांत कायमचे बंदिस्त होईल. कारण आजची युवापिढी देव्हाऱ्यावरचा एकही ग्रंथ वाचत नाही. भविष्यात शिवचरित्रही वाचले जाणार नाही. आताच काही ठिकाणी शिवाजी महाराजांच्या आरत्या वगैरे सुरू आहेत. त्यांचे पुजापाठ सुरू आहेत. त्यांच्या नावे उपवास सुरू आहेत. त्यांचे टाक बनवने सुरू आहे. हा सगळा प्रकार शिवाजी राजांच्या पराक्रमाचा, बुध्दीचा व कर्तृत्वाचा अवमान करणारा आहे. शिवाजीराजे आम्हाला देवासारखे आहेत. पण ते देव नाहीत व नव्हते, याचे भान ठेवायला हवे. राजे जर देव असते तर त्यांनी औरंगजेब जिवंत सोडला नसता. त्याला संपवले असते. पण राजांना त्यांच्या तुटपुंज्या सैन्यबळ व शस्त्र सामग्रीच्या जोरावर औरंगजेबाशी टक्कर देता आली नाही. याच औरंगजेबाने नंतर संभाजी राजांचा घात केला. संभाजी राजांचे पुत्र व पत्नीस कैदेत ठेवले. महाराज जर देव असते तर असे घडू शकले नसते. कारण देवाला काय अशक्य आहे ? असे आपण म्हणतोच ना ?

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!