कोरोना काळात मानसिक स्वाथ्य कसे जपता येईल ?

मार्गदर्शक : डॉ. कल्पना श्रीधर नागरे
संपर्क क्र. 9011720400
चिकित्सा आणि बाल मानसशास्त्रज्ञ
( एम. ए. बी. एड, एम. फील. सेट, पीएचडी )

गेल्या वर्षी आपल्याकडे चीन मधून कोरोना आला. जितक्या वेगाने आला, तितक्या वेगाने पसरला देखील. त्या सोबतच कोरोनाबद्दल माहिती ही पसरू लागली. काही खरी तर काही खोटी माहिती. सकारात्मक माहितीपेक्षा नकारात्मक माहिती जास्त दिली गेली. सतत न्यूज चॅनल वर दिसणाऱ्या अति रंजीत कोरोना विषयीची भडक माहिती, फेस बुक, व्हॉटस अँप इंस्टाग्राम tweeter…. यासारख्या विविध सोशल मीडिया वर तर ऊत आलेला… यांचा व्हायचा तोच परिणाम झाला.. लॉक डाऊन आणि मिळणारी माहिती यामुळे लोकांमध्ये कोरोना विषयी भीती निर्माण झाली. यामुळे लोकांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. सातत्याने कोरोनाबद्दल ऐकणं, वाचणं यामुळे अनेकांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतंय. विशेषत: अस्वस्थता आणि ओसीडी (ऑब्सेसिव्ह कंप्लसिव्ह डिसऑर्डर) आजार असणाऱ्यांना याचा सर्वाधिक त्रास होतो आहे. ‘फोबिया ‘( दुर्भिती ) चे प्रमाणही वाढत आहे, त्यामुळेच या ‘कोरोनाग्रस्त’ काळात तुमचं मानसिक आरोग्य कसं राखाल ? याविषयी थोडक्यात माहिती देत आहोत.

तुम्हाला अस्वस्थ वाटू लागेल किंवा तणाव वाटेल अशा बातम्या वाचणं, पाहणं शक्यतो टाळावे. घराबाहेर पडताना तसेच, सार्वजनिक ठिकाणी वावरताना काय काळजी घ्यावी याची माहिती मिळवा. त्यानुसार तुमच्याकरता आणि घरच्यांसाठी योग्य पावलं उचला. दिवसातून ठराविक वेळीच याविषयीचे अपडेट्स पहा. सतत तेच पाहात वा वाचत राहू नका.

“ज्यांना अँक्झायटी डिसॉईडर ( चिंता विकृती ) म्हणजेच अतिशय बेचैन होण्याचा, जास्त काळजी करण्याचा त्रास आहे, त्यांना एखादी गोष्ट आपल्या काबूत नाही असं वाटणं वा अनिश्चितता सहन करू न शकणं याचा त्रास होतो. त्यांनी अशा बातम्या बघणं टाळावे.

मानसिक आरोग्य जपण्यासाठी काय करायला हवं ?

मोजक्या बातम्या वाचा आणि आपण काय वाचतोय याकडे लक्ष द्या. कोरोना व्हायरस बद्दलच्या भरपूर बातम्या सतत वाचत राहणं तुम्हाला काळजीत टाकू शकतं. म्हणूनच बातम्या देणाऱ्या वेबसाईट्स आणि सोशल मीडियापासून काही काळ दूर रहा. ज्या गोष्टी पाहिल्याने वा वाचल्याने तुम्हाला बरं वाटण्यापेक्षा जास्त काळजी वाटायला लागते, अशा गोष्टींवर मर्यादित वेळ घालवा. किंबहुना दिवसातून कोणत्या वेळी बातम्या पहायच्या त्याची वेळ ठरवून द्या.

आजूबाजूला इतकं घडत असताना त्याविषयी वाचावसं वाटणं, अपडेट रहावंसं वाटणं स्वाभाविक आहे. पण त्याने तुमची काळजी वाढू शकते. म्हणूनच आपण कोणत्या अकाऊंटने वा युजरने पोस्ट केलेली माहिती वाचतोय याकडे लक्ष द्या.
चुकीची माहिती देणारे अकाऊंट्स, हॅशटॅग्स वा फिरणारे मेसेजेस यापासून दूर रहा. सोशल मीडियापासून दूर राहून टीव्हीवर वेगळं काहीतरी पाहण्याचा वा पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करा.

ट्विटरवर ज्या शब्दांमुळे तुमची बेचैनी वाढत असेल म्हणजेच अँक्झायटी ट्रिगर होत असेल त्याविषयी वाचणं टाळा किंवा असे अकाऊंट्स अनफॉलो वा म्युट करा. ज्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सतत याविषयीच चर्चा होते, ते देखील म्यूट करा आणि जर तुम्हाला बातम्यांचा वा माहितीचा भडिमार झाल्यासारखं वाटत असेल तर फेसबुक पोस्ट वा फीड ‘Hide’ करा. आपापल्या परीने घरात आनंदी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करा, त्यासाठी आपले छंद जोपासा, हलके फुलके वाचन करा, लहान मुले असतील तर त्यांच्या सोबत खेळ खेळा.

मन प्रसन्न ठेवा. गप्पागोष्टी करा पण त्यात नकारात्मक गोष्टींचा उल्लेख टाळा. लक्षात ठेवा कोणता ही आजार असो, त्यातून बाहेर पडण्यासाठी सकारात्मक विचार असणे गरजेचे आहे, ताण हा जीवनाचा स्थायीभाव आहे, त्याकडे सकारात्मक दृष्टीने बघा. कोरोनातून बरेच लोक बरे झाले आहे हे लक्षात घ्या आणि त्या दृष्टिकोनातून कोरोनाकडे बघा.

( लेखिका डॉ. कल्पना श्रीधर नागरे ह्या चिकित्सा आणि बाल मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांची सेट नेट मानसशास्त्र, मनोविकृती मानसशास्त्र, उपयोजित मानसशास्त्र, वैकासिक मानसशास्त्र आदी पुस्तके प्रसिद्ध आहेत. )

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!