इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
छंदाला अजिबात मोल नसते. आपली हौस भागवण्यासाठी वाट्टेल तेवढा खर्च करण्याची अनेकांची तयारी असते. यामध्ये अनेकजण सामाजिक कार्य करतांना छंद आणि क्रीडा प्रकाराला विविध साहाय्य करीत असतात. मात्र त्यामध्ये शाश्वत सुविधा नसल्याने तात्कालिक मदत फक्त होत असते. कायमस्वरूपी आणि दर्जेदार काम होण्याकडे नेहमीच कल असणारी इगतपुरी तालुक्यातील मानवेढे ही ग्रामपंचायत ओळखली जाते. सरपंच मनोहर वीर आणि उपसरपंच भाऊराव भागडे हे यादृष्टीने काम करीत असतात. त्याच अनुषंगाने दोघांच्या अथक प्रयत्नातून मानवेढे ग्रामपंचायतीने आपल्या स्वमालकीच्या २ एकर जागेवर सुसज्ज आणि दर्जेदार असे क्रिकेटचे मैदान उभे केले आहे. अनेक महिने डोळ्यांत तेल घालून तयार केलेल्या ह्या मैदानासारखे अव्वल आणि सर्वोत्तम मैदान उत्तर महाराष्ट्रातील पहिले मैदान ठरले आहे. ह्या मैदानाचा फायदा मानवेढे गावासह इगतपुरी तालुक्यातील विविध क्रीडा स्पर्धा आणि सभा समारंभासाठी होणार आहे. येत्या काही दिवसांत ह्या मैदानाला अजूनही चकचकीत करून गुणवत्तापूर्ण काम उभे करणार असल्याचे उपसरपंच भाऊराव भागडे यांनी सांगितले.
मानवेढे ग्रामपंचायतीने अनोखे क्रिकेट मैदान निर्माण केल्याचे समजले. ह्या भागातील जमिनीला सोन्याची किंमत असतांना ग्रामपंचायतीने २ एकर जागा क्रीडा क्षेत्राला समर्पित केल्याचा अतीव आनंद झाला. ह्या गावाला विकासकामांसाठी कधीच निधी कमी पडू देणार नाही. मानवेढे ग्रामपंचायतीचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.
- हिरामण खोसकर, आमदार इगतपुरी त्र्यंबकेश्वर
इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरातील पुनर्वसित असणारे मानवेढे गाव असून ह्या गावाने विकासाची वेगळी उंची गाठली आहे असे प्रतिपादन पीके ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत कडु यांनी केले. मानवेढे गावात २ एकरातील साकारलेले क्रिकेट मैदान शहरी भागालाही लाजवणारे मैदान असून या कामासाठी परिश्रम घेणारे सरपंच मनोहर वीर, उपसरपंच भाऊराव भागडे यांना सलाम करतो असेही प्रशांत कडू म्हणाले. उत्तर महाराष्ट्रातील ह्या सुंदर आणि भव्यदिव्य क्रिकेट मैदानाचे लोकार्पण आणि उदघाटन पीके ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत कडू यांच्या हस्ते आज झाले. यावेळी हजारो क्रिकेट रसिक आणि गावकरी उपस्थित होते. लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी सदस्य योगेश भागडे, अमोल भागडे, माजी सरपंच मनोहर वीर, उपसरपंच भाऊराव ज्ञानेश्वर भागडे, माजी सरपंच फुलचंद वीर, तंटामुक्ती अध्यक्ष भानुदास भागडे, ग्रामपंचायत सदस्य गोरख भागडे, सदस्य पोपटराव भागडे देविदास भागडे, लालुदादा वीर, सागर भागडे, विशाल पंडित, बोर्लीचे सरपंच सिताराम झुगरे, उपसरपंच गोविद भले आदींसह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, क्रिकेट खेळाडू, ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
आमच्या गावात आम्ही २ एकर क्षेत्रात उभे केलेले क्रिकेटचे मैदान उत्तर महाराष्ट्रात सुद्धा नसेल. प्रचंड मेहनत घेऊन आम्ही हे मैदान उभे केले आहे. ह्या मैदानाचा गावासह तालुक्याला विविध कार्यक्रमांसाठी मोठा फायदा होणार आहे. माझ्या गावकऱ्यांसाठी यापुढेही आम्ही अविरतपणे कार्यरत राहून विकास करू.
- भाऊराव भागडे, उपसरपंच मानवेढे