इगतपुरीनामा न्यूज (प्रतिनिधी)
इगतपुरी दि. १ :
नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतांना राज्य सरकारने कोरोना चाचणीच्या दरात कपात करून सामान्य माणसाला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
याआधी कोरोना चाचणी साठी सातशे रुपये आकारले जात होते मात्र नव्या दरानुसार आता पाचशे रुपये आकारले जाणार आहेत. सर्व प्रकारच्या खाजगी लॅबला हे नवीन दर लागू असणार आहेत. यासोबतच रॅपिड अँटीजेन टेस्टच्या दरातही कपात करण्यात आली असून ही टेस्ट आता अवघा दीडशे रुपयांमध्ये केली जाणार आहे.
राज्यातल्या कोणत्याही प्रयोगशाळेत यापेक्षा जास्त दर आकारले जाणार नाहीत अशी घोषणा खुद्द आरोग्यमंत्र्यांनी केल्याने याची तातडीने अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा सामान्य जनता बाळगून आहे.
सुरुवातीच्या काळात कोरोना चाचणीसाठी अगदी साडेचार हजार रुपये सुद्धा मोजावे लागले आहेत. सातत्याने रुग्णासंख्येत वाढ होत असल्याने चाचणी केल्याशिवाय पर्याय नाही, मात्र चाचणीचे दर न परवडणारे असल्याने सामान्य लोक चाचणी करण्यास उत्सुक नव्हते, मात्र त्यानंतर दर कमी होऊन बाराशे रुपये, त्यानंतरच्या टप्प्यात साडेसातशे रुपये आणि आता आजपासून अवघ्या पाचशे रुपयात चाचणी केली जाणार असल्याने संशयित रुग्णांनी चाचणी साठी स्वतःहून पुढे येणे अपेक्षित आहे. नवे दर हे चाचणी केंद्रावर जाऊन केलेल्या चाचणीसाठी असून रुग्णाच्या घरी जाऊन चाचणी करण्यासाठी आठशे रुपये आकारण्यात येणार आहेत.