इगतपुरीनामा न्यूज, दि. ११
“जननी जन्म भूमिश्च स्वर्गादपि गरीयसी” असा संस्कृत श्लोक आहे. माता आणि मातृभूमीचे स्थान स्वर्गापेक्षा अधिक असल्याचे ह्यात म्हटले आहे. अर्थात माझं गाव माझा अभिमान ही संकल्पना सुद्धा मोठी आहे. इगतपुरी तालुक्यातील मोडाळे गावातील प्रत्येक ग्रामस्थांचे आपल्या गावावर प्रेम आहे. ही भावना वृद्धिंगत होऊन आपल्या गावाला पुढे नेण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके चित्ताकर्षक संकल्पना आकाराला आणली आहे. मोडाळे गावातील महत्वाच्या जागेवर “आय लव्ह मोडाळे” असा लक्ष्यवेधी फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मोठ्या शहरांमध्ये तिथल्या नागरिकांमध्ये आपल्या शहराबाबत प्रेम नसले तरी लोकांमधील वात्सल्य जागृत करण्यासाठी असे फलक लावले जात असतात. मात्र एवढे करूनही फक्त सेल्फी पॉईंट म्हणून अशी ठिकाणे ओळखली जातात. तथापि गोरख बोडके यांनी गावकऱ्यांमध्ये यापूर्वी निर्माण केलेली एकात्मता, सामूहिक शक्तीची प्रेरणा आणि सहकार्याची भावना वृद्धिंगत केली आहे. त्यांनतर मोडाळे गावकऱ्यांचा आदर्श अन्य गावांनी घेण्यासाठी “माझं गाव माझा अभिमान” ह्या ब्रीदवाक्यानुसार “I Love मोडाळे” असा देखणा पॉईंट तयार केला आहे.
प्रत्येकाच्या मनात एक छोटंसं गाव असतं । ते किती सुंदर आहे हे ज्याचं त्यालाच ठाव असतं. इगतपुरी तालुक्यातील मोडाळे गावाने विविध क्षेत्रात अल्प कालावधीत मोठी प्रगती साधली आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांनी ह्याकामांमध्ये गावकऱ्यांसाठी झोकून काम केले. त्यामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे. गावकऱ्यांना माझं गाव माझा अभिमान आणि आय लव्ह मोडाळे यासारख्या संकल्पनेमुळे आनंद वाढला आहे. ह्या ठिकाणी ह्या भागातून मोठी गर्दी होत असून आपल्या स्वतःच्या गावाचा अभिमान निर्माण करण्यासाठी येथून ऊर्जा मिळत असल्याचे सांगण्यात आले.
माझ्या मोडाळे गावातला मातीचा रंग, गंध, स्पर्श, एवढेच नव्हे तर पंचभुतांचे संस्कार आमच्या सर्वांवर झालेले आहेत. त्या संस्कारांच्या शिदोरीवर माझ्या गावासह अनेक गावांना विकसित करण्याची क्षमता मिळाली. मोडाळे गावचे संस्कार घेऊन थेट काळजातून समाजसेवा करण्याची उर्मी मिळते. ही प्रेरणा आणि शक्तीस्थान म्हणून आपल्या गावाबाबत हृदयामधून प्रेम निर्माण करण्यासाठी "माझं गाव माझा अभिमान" आय लव्ह मोडाळे ही कल्पना आकाराला आणली. कितीही काही झालं तरी सुख गांवातच असतं ह्याची प्रचिती मिळते.
गावाची शिव दिसता । हर्ष दाटतो उरात
उमलून पाकळीचे । फुल होते क्षणात
- गोरख बोडके, जिल्हा नियोजन समिती सदस्य नाशिक