
इगतपुरीनामा न्यूज, दि. २७
अतिदुर्गम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानगंगा देण्यासाठी अनेकांकडून नियमित प्रयत्न होत असतात. अत्याधुनिक ज्ञानामुळे विद्यार्थ्यांना दूरदृष्टी ठेवून शैक्षणिक प्रगती साधता येते. इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी सुद्धा ज्ञानपिपासू आहेत. त्यामुळेच माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्याकडून ह्या शाळेवर विशेष लक्ष असते. खासगी शाळांना लाजवेल असे शाळेचे रुपडे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण इथल्या विद्यार्थ्यांना मिळते. ह्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागून सोप्या मार्गाने अभ्यास व्हावा यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्या विशेष प्रयत्नातून गोंदे औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा कंपनीने मदत केली आहे. अत्याधुनिक, दर्जेदार आणि बदलत्या अभ्यासक्रमानुसार सुविधा असलेले इंटर ऍक्टिव्ह प्रोजेक्टर मोडाळे जिल्हा परिषद शाळेला आज वितरित करण्यात आले. ह्या मदतीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांना आता गुणवता वाढवण्यासाठी चांगली मदत होणार असल्याचे शिक्षक आणि पालकांनी सांगितले.
माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांचे मोडाळे जिल्हा परिषद शाळेसह संपूर्ण गावातील चांगल्या उपक्रमांकडे विशेषत्वाने लक्ष असते. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षणाचा फायदा व्हावा म्हणून श्री. बोडके यांनी गोंदे औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा कंपनीचे व्यवस्थापक संदीप दुसाने, अंकुश श्रीवास्तव आदींसोबत नियमित पाठपुरावा केला. त्यानुसार कंपनीने जिल्हा परिषद शाळेला इंटर ऍक्टिव्ह प्रोजेक्टर दिले आहेत. ह्या उपक्रमाचे लोकार्पण आज शाळेत करण्यात आले. शिक्षक आणि ग्रामस्थांनी गोरख बोडके यांच्यासह महिंद्रा कंपनीची कृतज्ञता व्यक्त केली आहे. ह्या उपक्रमामुळे सुलभ आणि गोमटे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळून शिक्षणाची वारी खऱ्या अर्थाने साध्य होणार असल्याचे गोरख बोडके यांनी यावेळी सांगितले.
