
इगतपुरीनामा न्यूज – शंभर वर्षांचे आरोग्य मिळण्यासाठी स्वच्छ हवा, पाणी आणि चांगले अन्न मिळाले पाहिजे. यासाठी सक्षम शेती, विषमुक्त शेती काळाची गरज आहे. यासाठी निरंतर झटणारे कृषी पंढरीचे वारकरी स्व. कारभारी दादा गिते हे साक्षात पांडुरंगस्वरूप आहेत. म्हणूनच त्यांचा पुण्यस्मरण कार्यक्रमाचा सोहळा दरवर्षी पार पडतो. आयुष्यभर समाजाची सेवा करणाऱ्या ह्या व्यक्तिमत्वाला शतदा वंदन करतो प्रतिपादन आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी व्यक्त केले. सोनोशी येथील स्व. कारभारी दादा शिवार प्रतिष्ठानतर्फे कृषी आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना कृषी विज्ञान पुरस्कार वितरण आणि द्वितीय पुण्यस्मरण कार्यक्रमात ते बोलत होते. श्री. पेरे पाटील पुढे म्हणाले की, लोक आरोग्यपूर्ण आणि दीर्घायुष्य जगले पाहिजे म्हणून काम केले. प्रत्येकाने चार झाडे लावणे आवश्यक आहे. प्लास्टिकचा वापर कमी झाला पाहिजे. अन्न पदार्थांतील भेसळ कमी व्हावी असेही नमूद केले. माजी मंत्री आणि विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात म्हणाले की शेतीवर निष्ठा असणारे स्व. कारभारी दादा गिते यांच्यासारख्या मौलिक व्यक्तिमत्वामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना दिशा मिळाली आहे. शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या ह्या परिवाराला गौरव करावा तेवढा कमीच आहे. कृषी क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा गौरव करतांना अत्यानंद वाटतो असे मनोगत व्यक्त केले. यावेळी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू शरद गडाख, निमज येथील प्रगतीशील शेतकरी तुकाराम गुंजाळ, जुन्नर येथील गांडूळ खत प्रकल्प संचालिका काव्या दातखिळे यांना कृषी विज्ञान पुरस्कार प्रदान करण्यात आला. कृषी पंढरीचे वारकरी स्व. कारभारी दादा गिते यांच्या द्वितीय पुण्यस्मरण कार्यक्रमात ह्या पुरस्काराचे वितरण माजी मंत्री आणि विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात, माजी आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते झाले. यावेळी मान्यवरांनी कृषी दिनदर्शिकेचे प्रकाशन केले. पुणे येथील “एक दिवस समाजासाठी” संस्थेतर्फे प्राथमिक शाळेसाठी उपयुक्त किटचे वाटप यावेळी करण्यात आले. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी प्रतिष्ठान आणि गिते परिवाराच्या शेती क्षेत्रातील कार्याचे विशेष कौतुक केले. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू शरद गडाख, निमज येथील प्रगतीशील शेतकरी तुकाराम गुंजाळ, जुन्नर येथील गांडूळ खत प्रकल्प संचालिका काव्या दातखिळे, फ्रुटवाला बागायतदारचे प्रतिक मोरे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कारभारी दादा गिते शिवार प्रतिष्ठानतर्फे नाशिकचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी इंजि. हरिभाऊ गिते, डीआरडीओचे शास्त्रज्ञ डॉ. लहानभाऊ गिते, सोनोशी सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब गिते यांनी कार्यक्रमासाठी उत्तम व्यवस्थापन केले.