
इगतपुरीनामा न्यूज – तहसिल कार्यालय इगतपुरी येथे आज १४ वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. भारत निवडणूक आयोगाचा हा स्थापना दिवस २०११ पासून संपूर्ण देशभरात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा मतदारांना, विशेषतः नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन देणे, सुलभरीत्या त्यांची नाव नोंदणी करून घेणे हा आहे. देशातील मतदारांना समर्पित केलेल्या या दिवसाचा उपयोग मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा म्हणून त्यांना जागरूक करण्यासाठी केला जातो. तहसिल कार्यालय इगतपुरी येथे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्यासंबधी शपथ घेतली. लोकशाहीत मतदानाचे महत्व विषयावर मतदाराचे हक्क व कर्तव्य जबाबदारी या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला. इगतपुरी तालुक्यातील सर्व मतदार यादीभागात BLO यांच्यामार्फत मतदार दिवस साजरा करण्यात आला. कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय टाके घोटी इगतपुरी येथे राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला. ह्या कार्यक्रमासाठी इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर, निवडणूक नायब तहसीलदार वर्षा वाघ उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मतदार दिनाबद्धल मार्गदर्शन केले. १८ वर्ष वय पुर्ण झालेल्या नवीन विद्यार्थ्यांची मतदार नाव नोंदणी करण्यात आली. EVM मशिन्सवर मतदान बाबत विद्यार्थी व प्राध्यापक यांना प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमांतर्गत रांगोळी स्पर्धा, भित्तीपत्रक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तहसिल कार्यालय इगतपुरी येथे निवडणूक नायब तहसीलदार वर्षा वाघ यांनी महिलांसाठी हळदी कुंक कार्यक्रमाचे आयोजन करुन महिला मतदार नोंदणी वाढवण्यासाठी आवाहन केले. उपस्थित महिलांना तुळस रोपे वाटप करण्यात आले.