इगतपुरीनामा न्यूज, दि. २६
शासन स्तरावर शासकीय योजनांची जनजागृती करण्यासाठी लोक कलावंतांना जनजागृती कार्यक्रम द्यावेत. तमाशा मंडळाच्या धर्तीवर रजिस्टर लोककलावंतांना भारत सरकार प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो आणि माहिती व जनसंपर्क विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक जिल्हाधिकारी व जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, नगर परिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायती कडून आदेश देण्यात यावेत अशी मागणी महाराष्ट्र जनजागृती लोककलावंत परिषदेने केली आहे लोक कलावंतांना जगण्यासाठी आधार द्यावा अशी मागणी महाराष्ट्रातील रजिस्टर लोक कलावंत संस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
शाहीर बाळासाहेब मालुसकर पुणे, सत्यभामा आवळे पुणे, शाहीर सुभाष गोरे सोलापूर, शाहीर रंगराव पाटील कोल्हापूर, शाहीर उत्तम गायकर नाशिक, शाहीर विनोद ढगे जळगांव, शाहीर रमेश गिरी नांदेड, उषा कांबळे लातूर, शाम धोंगडे हिंगोली, वसंत उके अमरावती, शाहीर बजरंग आंबी सांगली, अशोक केदार मुंबई, शाहीर बाबू सेवालाल राठोड जालना, शाहीर डी. आर. इंगळे बुलढाणा, शाहीर गजेंद्र गवई बुलढाणा, शाहीर सुरेश जाधव औरंगाबाद, शाहीर उबाळे परभणी, शाहीर मीना कांडेकर बीड, शाहीर अरवेल ठाणे, समीर दांडारे नागपुर, विक्रम फडके भंडारा, सुनील नलावडे सातारा, सुशील सहारे चंद्रपूर व अन्य सर्व जिल्ह्यातील प्रमुख लोक कलावंतांनी विविध मागण्या शासनाकडे केल्या आहेत.
तमाशा मंडळांना ज्याप्रमाणे फेब्रुवारीपासून परवानगी देण्यात आली त्या प्रमाणे या सरकारदरबारी नोंद असलेल्या कलावंतांना राष्ट्रीय प्रचार व जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम देण्यात यावेत अशी मागणी महाराष्ट्र जनजागृती लोककलावंत परिषद यांच्या माध्यमातून होत आहे. आतापर्यंत शासनाने चित्ररथ व ध्वनिफीत डिजिटल माध्यमातून लाखो रुपयांची उधळपट्टी केली. पण खरा प्रचार करणारे लोककलावंत उपाशी आहेत. याचा विचार शासनाने महामारीच्या काळात केला असता तर कलावंतांना उदरनिर्वाहाचे साधन मिळाले असते. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लॉकडाऊन काळात तमाशा संगीतबारी कलावंतांना ३ हजारांची मदत दिली. आता नुकतेच तमाशा फड लोक कलावंतांना ३ हजारांची मदत जाहीर केली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत. मग त्यांना महाराष्ट्रातील इतर लोक कलावंत दिसत नाहीत का? मइतर लोक कलावंतांना वाली कोण? हाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. कलावंताच्या कुटुंबाचा व त्या सर्वांचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख व राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी या लोककलावंतांसाठी सरकारी योजनांच्या प्रचार कार्यक्रमांना निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी या सरकारी योजनांचा प्रचार करणाऱ्या लोक कलावंतांच्या माध्यमातून होत आहे. कोरोना काळात अनेक कलावंतांची ससेहोलपट झाली. त्यात अनेकांनी आत्महत्या केल्या तर काहींनी इच्छा मरणाची परवानगी मागितली. दुर्लक्षित केले गेल्याने नैराश्यात असणाऱ्या शासनमान्य कलावंतांची उपेक्षा न करता समान न्याय देऊन सरकारी कार्यक्रम देऊन होणाऱ्या हाल अपेष्टा व मरण यातना दुर कराव्यात अन्यथा शासनमान्य कलावंतांना आत्महत्येशिवाय पर्याय नसुन रस्त्यावर उतरून न्याय मागावा लागेल असा इशारा महाराष्ट्र जनजागृती लोककलावंत परिषदेने दिला आहे.