शेतकरी, कामगार आणि श्रमिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आयुष्यभर झपाटलेले दिवंगत स्वातंत्र्यसैनिक नामदेवराव गोडसे

कॉम्रेड नामदेवराव शिवराम गोडसे यांचे नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. संसरी ता. जि. नाशिक येथील स्वातंत्र्यसैनिक भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते समाजकारणात नेहमी अग्रेसर असणारे नामदेवराव शिवराम गोडसे यांनी गोवा मुक्ती संग्रामाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. त्याचबरोबर ते इगतपुरीचे पहिले आमदार कॉम्रेड पुंजाबाबा गोवर्धने, माजी आमदार दिवंगत कॉम्रेड माधवराव गायकवाड, कॉम्रेड गोविंद पानसरे, कॉम्रेड  जेष्ठ नेते एस. ए. डांगे, कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबरोबर विविध शेतकरी आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होते. याकरिता त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. कॉम्रेड नामदेवराव हे नेहमी समाजकार्यात अग्रेसर असत. कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून ते भारतभर विविध कार्यात सहभागी असत. योगायोग म्हणजे कालच ज्येष्ठ समाजकारणी कॉम्रेड एन. डी. पाटील यांचे यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दुसऱ्या दिवशी त्यांच्या विचाराचे सहकारी कॉम्रेड नामदेवराव यांनीदेखील या जगाचा निरोप घेतला. आयुष्यभर भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा कार्यरत असणाऱ्या नेत्याला भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आयटकच्या वतीने लाल सलाम!! त्यांचा विचारांचा वारसा शेतकरी कामगार श्रमिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करणे, मार्क्सवादी, फुले शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार, भारतीय संविधानाची मूल्य रुजवण्यासाठी काम करणे हीच खरी आदरांजली ठरेल.
नाशिक तालुका शेतकी संघाचे अनेक वर्षे अध्यक्षपद, नाशिक पंचायत समितीचे सदस्य पद, भाकपाचे राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष पद आदी अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.
जिल्हा बँकेचे माजी अधिकारी हरिश्चंद्र दामू पाटील बऱ्हे यांचे ते सासरे व अधरवडच्या उपसरपंच मिराबाई हरिश्चंद्र बऱ्हे यांचे ते वडील होते. त्यांना अखेरचा लाल सलाम..!

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!