इगतपुरीनामा न्यूज, दि. १६
रब्बी हंगामाच्या ई-पीक पाहणीची कार्यवाही सुरू झाली आहे. मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणीची मुदत महसूल विभागाने १५ फेब्रुवारी पर्यंत ठरवून दिलेली होती. परंतु, नुकत्याच झालेल्या बैठकीत ई-पीक पाहणीसाठी शासनाने मुदतवाढ दिली असून पीक पाहणीची अंतिम मुदत २८ फेब्रुवारी इतकी वाढविण्यात आली आहे. या मुदतीत शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपद्वारे प्रत्यक्ष ई-पीक पाहणी करावयाची आहे. ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांना तलाठ्याकडे न जाता सातबारावर विविध पिकांची नोंद करणे शक्य झाले आहे.
महसूल विभागाचा हा प्रकल्प मागील वर्षीच्या १५ ऑगस्ट पासून महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे. या माध्यमातून आतापर्यंत ९८ लाख शेतकऱ्यांनी पिकांची नोंद केली आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांची ई-पीक पाहणीची नोंदणी चालू असून त्यासाठी १५ फेब्रुवारी अशी मुदत होती. परंतु, उशिरा मान्सून आणि कोरोनामुळे शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता आली नाही. यासाठी जमाबंदी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ई-पीक पाहणीची मुदत २८ फेब्रुवारी इतकी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे या कालावधीत शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करावी असे आवाहन महसूल विभागाने केले आहे.