
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात ८० आदिवासी पाडे पाणी टंचाईच्या तीव्र झळा सोसत आहेत. नागरिकांच्या करातून मंजूर झालेल्या पाण्याच्या योजना कुचकामी ठरल्या असून ठराविक लोकांच्या पोटात योजनांचा पैसा गेला आहे. फक्त भ्रष्टाचार करण्यासाठीच कोट्यवधी रुपयांच्या पाणी योजना राबवल्या गेल्या आहेत. तालुका प्रशासन राजकारणी लोकांच्या हातातील बाहुले बनले गेल्याचे चित्र आहे. दरवर्षी पाणीटंचाई असूनही प्रशासन कोणत्याही उपाययोजना करीत नाही. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका रखडलेल्या असल्याने अधिकाऱ्यांचे राज्य नागरिकांच्या मुळावर बसले आहे. विधानसभा लोकसभा निवडणुकीवेळी लोकांना विकासाचे गाजर दाखवून लोकांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर मौन धरणाऱ्या आमदार खासदारांनी लोकांकडे पाठ फिरवली आहे. घोटी शहरात निवडणुकीवेळी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी अनेकानेक आश्वासने देऊन मते मागितली होती. म्हणून इगतपुरी तालुक्यातील ८० आदिवासी पाड्यावरील आदिवासी महिला, युवती आणि नागरिक येत्या २० एप्रिलला उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या दौऱ्यावेळी रिकामे हंडे वाजवून आंदोलन करणार आहेत. उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांना हंडे वाजवून आमच्या समस्या कधी सोडवणार ह्याचा जाब विचारणार आहेत अशी माहिती एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनी दिली. यावेळी संघटनेतर्फे इगतपुरी त्र्यंबक तालुक्यातील पाणीटंचाई, जलजीवन योजनेतील भ्रष्टाचार, भ्रष्टाचारी ठेकेदारशाही, बेबंद नोकरशाही पोसण्याचे काम लोकप्रतिनिधी करत आहे. यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांना मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे. ८० आदिवासी वाड्यापाड्यावरील माता भगिनी दूरवरून येणार असल्याने १९ एप्रिलला रिकामे हंडे हातात घेऊन घोटीत मुक्कामी येणार आहेत. २० तारखेला ना. अजित पवार यांच्या दौऱ्यावेळी हंडे वाजवून आपल्या मागण्या मांडणार असल्याचेही श्री. भगवान मधे यांनी सांगितले.