इगतपुरीनामा न्यूज, दि. १७
ज्येष्ठ नेते भाई एन. डी. पाटील महान कर्मयोगी असलेले शेतकरी कामगार पक्षातील दुसऱ्या फळीतील ते नेते होते. जुने जाणते शेतकरी कामगार पक्षाचे काही संस्थापक सदस्य हे पक्ष सोडून काँग्रेसवासी झाले तेव्हाच दुसऱ्या फळीतील भाई प्रा. एन. डी. पाटील यांनी ऐन तारुण्यात पक्षाची धुरा सांभाळली व पक्षाची विचारांना व कार्यकर्त्यांना सन्मान मिळवून दिला. तशी एनडी यांची नाळ ही नाशिक जिल्ह्याशी जोडली गेलेली होती. शेतकरी कामगार पक्षाचे नाशिक जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्ते शिबिर, अधिवेशन, आंदोलन यात प्राधान्याने भाई उपस्थित राहत असत. नाशिकचा पक्षाचा कोणताही कार्यक्रम असो एनडी यांच्या उपस्थितीशिवाय व मार्गदर्शनाशिवाय तो पूर्ण होत नसे. मी वयाच्या अगदी कुमार वयापासून पक्षाचे काम करत असल्याने त्यांना जवळून पाहण्याचा, चर्चा करण्याचा योग आलेला आहे. ते अर्थतज्ञ, शेती तज्ञ व साम्यवादी विचारसरणीचे फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराने प्रभावित झालेले नेतृत्व होते.
नाशिक ते नागपूर या पायी दिंडीचे त्यांनी नेतृत्व केले होते. वैतरणा, घोटी, पिंपळगाव बसवंत, सायखेडा व मोहाडी येथे त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांचे अभ्यास शिबीर घेतले होते. यातील मोहाडी येथील अभ्यास शिबिरात त्यांनी सलग तब्बल दीड दिवस मार्क्सवाद व पक्षसंघटना यावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. हे एक ऐतिहासिक रेकॉर्ड होय. नाशिक येथील अनेक आंदोलनात त्यांनी भाई विठ्ठलराव हांडे यांच्या समवेत सक्रिय सहभाग घेतलेला होता. भाई एनडी एक अभ्यासू नेतृत्व होते. त्यांचा समाजवाद अर्थशास्त्र, राजकारण, राज्यशास्त्र, इतिहास यावर सखोल अभ्यास होता. शेतकरी कामगार पक्षाची संघटना व पक्ष तरुणांच्या हातात देण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन पक्षाच्या नाशिक येथील अधिवेशनात स्वतःचे पक्षाचे सरचिटणीस हे सर्वोच्च पद हे भाई जयंत पाटील यांना देऊन त्यांनी कृतीतून संकल्पना राबवली. एनडी हे कणखर अभ्यासू तर होतेच पण मिस्कील स्वभावाचे होते. घोटी येथील अभ्यास शिबिरादरम्यान मी त्यांना एक प्रश्न विचारला होता की, शरद पवार हे तुमचे नातेवाईक असताना ही तुम्ही त्यांच्यावर एवढी टोकाची टीका का करता ? त्यांनी असे उत्तर दिले की मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतो ती सरकारविरोधी असते. मिस्किलपणे अस्सल कोल्हापुरी भाषेत असेही म्हणाले की “त्याची बहीण माझ्याकडे आहे ; माझी बहीण त्याच्याकडे नाही, त्यामुळे मला घाबरण्याचे काही कारण नाही.”
आमच्या पिढीने फुले-शाहू-आंबेडकर बघितले नाही पण ज्यांच्या तोंडून आम्ही समाजवाद व मार्क्सवादाचे धडे घेतले, ज्याच्याकडून आम्ही फुले समजावून घेतले असे आमचे गुरुवर्य भाई एन. डी. पाटील आज शरीराने जरी आमच्यातून गेले असले तरी त्यांनी दिलेले विचार व राजकीय शिकवण ह्या रूपाने ते नक्कीच आमच्या डोक्यात व राजकीय आचरणात जिवंत राहतील. भाई एनडी यांना क्रांतिकारी लाल सलाम..!