2 महिन्यापासून वाघेराचा कोशिम पाडा अंधारातच ;
महावितरणचा भोंगळ कारभार ; अधिकारी नॉट रीचेबल

महावितरण कार्यालय, हरसूल

इगतपुरीनामा न्यूज, दि. २८
( सुनिल बोडके यांच्याकडून )

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा ग्रामपंचायत अंतर्गत कोशिम पाडा महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे गेल्या 2 महिन्यापासून अंधारात आहे,
वाघेरा येथील ग्रामपंचायतीने वारंवार पत्रव्यवहार करून रोहित्र बदलून देण्याची मागणी केली. मात्र महावितरणचे अधिकारी सुस्त अवस्थेत बसून ग्रामस्थांच्या मागणीला केराची टोपली दाखवत आहे.
संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता अधिकारी नॉट रीचेबल असल्याचे समजते. कोणत्या कारणामुळे कोशिम पाडा येथील वीज पुरवठा बंद आहे याची माहिती अधिकारी वर्गाकडून मिळाली नाही.
कोशिम पाड्याला लागून जंगल असल्याने येथे कायमच वन्य जीवांचा वावर असतो. रात्रीच्या वेळी  त्यापासून धोकाही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विजेचा प्रश्न हा येथील ग्रामस्थांसाठी महत्त्वाचा विषय आहे.
कित्येक दिवसापासून वायरमन या भागात फिरकला नसून अंदाजे रीडिंग घेऊन लाईट बिल येत आहे. लाईट बिल ही गावात न येता हरसूल येथील चिंचवड फाट्यावर ठेवून वायरमन आपले कर्तव्य बजावत आहेत. या विरोधात कोशिम पाडा येथील नागरिकांनी वारंवार संताप व्यक्त करून संबंधित अधिकाऱ्यांना लेखी तसेच तोंडी तक्रार केली असून कुठला ही फरक पडला नाही.

दोन महिन्यापासून येथील रोहित्र बिघडले आहे. महावितरण विभागाला सांगून अनेकदा तक्रार दिली. परंतु काही फरक पडला नाही. ग्रामपंचायत मार्फत पत्र देऊनही अधिकारी दखल घेत नाही. परिणामी दोन महिना हा पाडा अंधारात आहे. पाड्याच्या बाजूला जंगल असल्याने रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांचा धोका आहेच. महावितरण अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे. अनुचित प्रकार प्रकार झाल्यास याला अधिकारी जबाबदार राहतील.
लहानू भोये, वाघेरा अंतर्गत कोशिमपाडा ग्रा. पं. सदस्य

कित्येक वेळा महावितरण अधिकारी यांना कोशिम पाडाच्या लाईट संदर्भात फोन केला. परंतु ते उचलत नाही, कुठला प्रतिसाद ही देत नाही. दोन महिने झाले लाईट नाही. लवकरात हा प्रश्न मार्गी लागला नाही तर ग्रामस्थांसह महावितरण कार्यालयात ठिय्या द्यावा लागेल.
दिलीप खेडूळकर, सामाजिक कार्यकर्ते वाघेरा