प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०
जव्हार संस्थानचे २१ वे वंशज व फ्लाईट लेफ्टनंट श्रीमंत यशवंतराव मुकणे महाराज यांचे नातू श्रीमंत महेंद्रसिंह दिग्विजय मुकणे हे व त्यांचे पुर्वज मुळचे मुकणे गावचे. सध्या जव्हार संस्थान येथे त्यांचा मोठा राजवाडा असुन मुकणेकरांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. आजवर फक्त याबाबत ऐकीवात असणारे महेंद्रसिंग मुकणे यांनी त्यांच्या मूळगावी मुकणे गावी एकदा भेट द्यावी यासाठी मुकणेचे माजी सरपंच तथा घोटी बाजार समितीचे माजी संचालक विष्णु राव हे अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होते. अखेर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गोरख बोडके यांच्या माध्यमातुन महेंद्रसिंग मुकणे हे मुकणे या पूर्वजांच्या मुळगावी भेटीसाठी आल्याने मुकणेकरांसाठी हो मोठी आनंददायी पर्वणीच ठरली. यावेळी मुकणेकरांच्यावतीने माजी सरपंच विष्णु पाटील राव, सरपंच हिरामण राव, उपसरपंच भास्कर राव, ग्रामसेवक दिपक पगार यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी आमदार शिवराम झोले, बाजार समितीचे माजी संचालक सुनील जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, गोंदेदुमालाचे माजी सरपंच गणपत जाधव, मुकणेचे माजी सरपंच विष्णु पाटील राव, हनुमंता गायकवाड, चंद्रभान बोराडे, सरपंच हिरामण राव, उपसरपंच भास्कर राव, पोपट राव, ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती आवारी, गणेश राव, ज्ञानेश्वर राव, मोहन बोराडे, काळु आवारी, अनिल राव आदींसह मुकणे गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावकऱ्यांनी केलेल्या स्वागताने महेंद्रसिंग मुकणे यांनी स्वतः भारावुन गेल्याचे सांगत येत्या काही दिवसांत पुन्हा सहकुटुंब सहपरिवार मुकणे गावाला भेट देऊ असे म्हणाले. आपल्या मुळगावात आपण आल्याचा आपल्याला खुप आनंद झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. जुन्या जाणत्या जेष्ठ व्यक्तींकडून यशवंतराव मुकणे यांच्या आठवणींना उजाळा देतांना अनेक आठवणी जाग्या होतात. त्यातीलच एक म्हणजे पुर्वी मुकणे गावात मारुती मंदिर होण्यासाठी इच्छा व्यक्त करीत एक रात्रीत मंदिर बांधण्यासाठी संपुर्ण पैसेही स्वतः खर्च करण्याची तयारीही त्यावेळी यशवंतरावांनी दाखवली असल्याचे बोलले जाते. त्यावेळी म्हणजे कित्येक वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या मुकणे गावातील मारुती मंदिरासाठी स्वतः यशवंतरावांनीच सागवान लाकडे उपलब्ध करून दिले होते ते आजही जैसे थे आहे. आताही यशवंतरावांचे वंशज आपल्या मूळगावी आल्यानंतर मुकणे गावच्या ग्रामस्थांप्रमाणेच तेही भारावुन तर गेलेच व गावासाठी काहीतरी भरीव काम करण्याची त्यांची मनस्वी इच्छाही त्यांनी भेटीप्रसंगी व्यक्त केली. यावेळी मुकणे गावाच्या वेशीवर सुसज्ज स्वागत कमान व गावात एक सभामंडप देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.