इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
वाडीवऱ्हे ते सांजेगाव हा रस्ता मंजूर असूनही त्याचे काम सुरू करायला चालढकल करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी चांगलाच दणका दिला आहे. मंगळवारी आमरण उपोषण करणार असल्याच्या धास्तीने अखेर ह्या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. यामुळे ह्या भागातील नागरिकांनी गोरख बोडके यांचे आभार मानले आहेत.
वाडीवऱ्हे ते सांजेगाव ह्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्याने ह्या भागातील नागरिक अत्यंत त्रस्त झाले होते. ह्याची तातडीने दखल घेऊन आमदार हिरामण खोसकर, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता ह्यांची भेट घेतली. ह्या रस्त्यांसाठी २०२० च्या पावसाळ्यानंतर पुरहानी दुरुस्ती अंतर्गत ( SR ) ह्यानुसार १ कोटी ३५ लाखांचा निधी १ वर्षांपूर्वी मंजूर झालेला आहे. ह्या कामाचे भूमिपूजन आमदार हिरामण खोसकर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी ११ जुलै २०२१ ह्या दिवशी भूमिपूजन केले. मात्र ह्या कामाचे संबंधित ठेकेदार व अधिकारी पावसाच्या नावाखाली अद्यापपर्यंत रस्त्याचे काम जलदगतीने सुरू करीत नाही. म्हणून परिसरातील आणि तालुक्यातील येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची खूप हाल होत होते. यासाठी अनेक नागरीक वारंवार रस्त्याच्या कामासाठी गोरख बोडके आणि पदाधिकाऱ्यांना फोनवर संपर्क साधत होते. त्यानुसार वेळोवेळी ठेकेदार आणि अधिकारी यांच्याशी संपर्क करून पाठपुरावा करत असूनसुद्धा हे काम सुरू होत नव्हते. यामुळे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्या सहनशीलतेचा अंत झाला होता. त्यामुळे त्यांनी अधिकारी आणि ठेकेदार यांच्या निषेधार्थ मंगळवारी इगतपुरी तहसीलदार कार्यालयासमोर सर्वपक्षीय पदाधिकारी आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला होता. आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी धसका घेऊन रस्त्याचे काम सुरू केल्याने नागरिकांनी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांचे आभार मानले आहेत.