पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांची बेधडक कारवाई : इगतपुरीजवळ १ कोटी २८ लाखांचा गुटखा जप्त करून २ वाहनांसह २ जण गजाआड

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्याकडून दमदार कामगिरी केली जात आहे. आज शुक्रवारी त्यांनी आपल्या कौशल्यदायी गुप्त माहितीनुसार नाशिकहून मुंबईच्या दिशेने महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक करणारी दोन वाहने ताब्यात घेऊन मोठी कारवाई केली आहे. इगतपुरी जवळ ग्रँड परिवार हॉटेल समोर १ कोटी २८ लाख किमतीच्या १७८ गोण्या गुटखा जप्त केला आहे. यासह लाखो रुपये किमतीचे २ वाहने सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहेत. याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११२/२०२३ दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु करण्यात आला आहे. ही धडक कारवाई इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी स्वतः आपल्या पोलीस पथकामार्फत केली. संशयित आरोपी वाहनचालक सलमान अमीन खान वय ३२, इरफान अमीन खान वय ३१ रा. हरियाणा यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी राज भाटिया रा. जयपूर राजस्थान, राजकुमार बाबू सपाटे रा. भिवंडी हे संशयित आरोपी पोलिसांना पाहिजे आहेत.

पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी आपल्या पथकातील अधिकाऱ्यांमार्फत सापळा रचून दोन मोठे वाहन पकडून झाडाझडती केली. त्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा आढळून आला. SHK Premium आणि 4K ( STAR ) ह्या गुटख्याच्या एकूण १७८ गोण्या जप्त करण्यात आल्या. १ कोटी २८ लाख किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. इगतपुरी पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहितेचे विविध कलम आणि अन्न सुरक्षा मानके कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या नेतृत्वाखालील पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे, विकास ढोकरे, सचिन देसले, मुकेश महिरे, किशोर खराटे, संवत्सर, अहिरे, विजय रुद्रे, अभिजित पोटींदे, गिरीश बागुल आदींनी ही मोलाची कामगिरी केली. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी ह्या कामगिरीबद्धल सर्वांचे अभिनंदन केले असून २५ हजाराचे बक्षीस घोषित केले आहे. इगतपुरी पोलीस ठाण्याद्वारे गुन्हेगारांचे निर्दाळण सुरु असून अवैध धंदे बंद झाल्याने सामान्य नागरिक खुश आहेत.

Similar Posts

error: Content is protected !!