शैलेश पुरोहित, इगतपुरीनामा न्यूज, दि. ६
संपूर्ण भारतात स्फटिक शिवलिंगाची अगदी मोजकीच मंदिरे आहेत. त्यातही महाराष्ट्रात एकमेव स्फटिक शिवलिंग मंदिर आहे. हे मंदिर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील बोरटेंभे येथे स्थापित आहे. येथील राज राजेश्वरी मंदिरात काही वर्षांपूर्वी स्फटिक शिवलिंगाची स्थापना झालेली आहे. आज श्रावण महिन्यातील शेवटचा श्रावणी सोमवार आहे. इगतपुरी तालुक्यातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या बोरटेंभे येथील नीलकंठ धाम येथे भक्तांनी गजबजलेल्या या मंदिर परिसरात सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शुकशुकाट पहायला मिळाला.
कोरोनामुळे नीलकंठ धाम मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार श्रावणातील यात्रा उत्सवही रद्द करण्यात आले आहे. पहाटे 5 वाजेच्या आरतीनंतर मंदिर पुन्हा बंद करण्यात आले आहे. मंदिरातील पुजाऱ्यांच्या हस्तेच महापुजा आणि आरती करण्यात आली. नेहमी भाविक भक्तांनी गजबजलेलं राहणाऱ्या या देवळात आज शुकशुकाट पहायला मिळाला. असे असले तरी अनेक भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन लांबून घेतले.