
इगतपुरीनामा न्यूज, दि. २५
ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्याना दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध होणे महत्वाचे असून कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित रहाता कामा नये. विद्यार्थ्याला आपल्या आवडीप्रमाणे विषय व शाखा निवडता आल्या पाहिजे असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक भाऊसाहेब खातळे यांनी केले.
येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समितीने दिलेल्या भेटी प्रसंगी श्री. खातळे बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. पी.आर. भाबड, प्रा. डॉ. राजेंद्र शेलार, प्रा. डॉ. यू. पी. शिंदे, प्रा. डॉ. एम. डी. देशपांडे, प्रा. डॉ. सुदेश घोडेराव , उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी उपस्थित होते.
श्री. खातळे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की आज शिक्षणाच्या सुविधा विद्यार्थ्याना उपलब्ध झाल्या तर विद्यार्थी स्वतःची प्रगती चांगल्या प्रकारे करू शकतो. याप्रसंगी समितीचे चेअरमन प्रा. डॉ. राजेंद्र शेलार व प्रा. डॉ. यू. पी. शिंदे यांनी महाविद्यालयाला तृतीय वर्ष विज्ञान शाखेसाठी भौतिकशास्त्र विषय विशेष स्तरावर सुरु करण्यासाठी परवानगी देत असल्याचे सांगून महाविद्यालयाच्या प्रगतीबदल समाधान व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी महाविद्यालय राबवित असलेल्या उपक्रमाचा व प्रगतीचा आढावा सादर केला. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यू. एन. सांगळे यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.