वाल्मीक गवांदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
इगतपुरीतील कॅपटाऊन व्हिलाज रिसॉर्ट नेहमीच पर्यटकांच्या वेगवेगळ्या घटना व वादाच्या भोवऱ्यात असते. कॅपटाऊन व्हिलाज हे रहिवासी संकुल असतांना या ठिकाणी रिसॉर्टची परवानगी नसतांनाही पर्यटकांना भाडे तत्वावर लॉजींग व लग्न समारंभासाठी ऑनलाइन बुकींग केली जाते अशी स्थानिकांची ओरड आहे. असे असतांना मंगळवारी घोटी येथील व्यापाऱ्याच्या पुतणीच्या लग्न सोहळा या कॅपटाऊन हिलाजमध्ये सुरू होता. यावेळी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास वधुचे सोन्याचे ६ लाख ११ हजार रूपये किमतीच्या दागिन्यांची बॅग अज्ञात इसमाने चोरी करून पलायन केले. या घटनेबाबत नवऱ्या मुलीचा चुलता ताराचंद केवलचंद बबेरवाल, वय ४५, रा. घोटी यांनी चोरीच्या घटनेबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादीत म्हटले कि पुतणीचे लग्न सोहळा सुरू असतांना एक अज्ञात इसम व्यासपीठावर तोंडाला मास्क लावुन चोरीच्या तयारीने आला. कोणाचेही लक्ष नसल्याचे पाहुन दागिने असलेली बॅग घेवुन निघुन गेला. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात व लग्न समारंभातील फोटो शुटींगमध्ये ह्या इसमाच्या हालचाली व फोटोत तो कैद झाला आहे. हा इसम अनोळखी असुन लग्न सोहळयात आला की बोलावला गेला या बाबत उलट सुलट चर्चा आहे. या ठिकाणी या आधीही अनेक पर्यटकांच्या लहान मोठया चोऱ्या झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेचा अधिक तपास इगतपुरीचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे, पोलीस उपनिरीक्षक राजाराम दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार जाधव व पोलीस हवालदार विजय रुद्रे, खिलारे आदी करीत आहेत.