
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख परिसर, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसर, हिवरमाथा मळे वस्ती परिसर, पाडळी देशमुख सोसायटीचे व्हाईस चेअरमन विलास रामचंद्र धांडे यांच्या घराभोवती बिबट्याचे वारंवार दर्शन होत होते. या बिबट्याने अनेक जणांचे पाळीव कुत्रे, शेळ्या, छोटी गाई वासरे फस्त केल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते. यामुळे रात्री अंधार पडल्यानंतर या भागातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांसाठी बाहेर पडण्यास भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. वडनेर, पिंपळगाव खांब, विहितगाव परिसरात घडलेला प्रकार अतिशय भयावह असल्याने तसा प्रकार आपल्या भागात घडू नये म्हणून गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी इगतपुरीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी आणि स्थानिक वन परिमंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी केली होती. पाडळी देशमुखचे सामाजिक कार्यकर्ते गोपी धांडे यांच्या सततच्या रेट्यामुळे इगतपुरी वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला आज जेरबंद केले. बिबट्या पिंजऱ्यात बंद होताच परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. पिंजरा लावण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे ग्रामस्थानी आभार मानले. ज्येष्ठ नागरिक ठकाजी केसू धांडे, सुरेश गोगाजी धांडे, कचरू शंकर गवारी, रामभाऊ धांडे, रामदास पाटील धांडे, संजय धांडे, दत्तू गायकर, सामाजिक कार्यकर्ते गोपी धांडे, प्रल्हाद धांडे माजी उपसरपंच बाळासाहेब आमले, भानुदास धांडे, व्हाईस चेअरमन विलास धांडे, कृष्णा चौधरी, नामदेव धांडे, कचरू नामदेव धांडे, कैलास एकनाथ धांडे, सुरज धांडे, वैभव दादा धांडे, वैभव धोंडू धांडे, रोशन धांडे अनिल धांडे, वनरक्षक रूपाली मोरे, वनरक्षक एस. एन. गाढवे, आर. डी. बगड, श्री. बेंडकुळे आदी उपस्थित होते.