सुनिल बोडके, इगतपुरीनामा न्यूज, दि. १
इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. दोन्ही तालुक्यात अनेक शेतकर्यांनी भाताची सोंगणी करुन पेंड्या बांधुन ठेवल्या आहेत. काही जणांनी भात सडकुन खळ्यावरच डेपो मारुन ठेवला आहे. त्यामुळे भात भिजुन त्याची प्रतवारी खालावल्याने भाताला कमी भाव मिळण्याचा धोका निर्माण झाला आहे. पशुधनाचा चारा असलेले तणस सडुन काळे पडणार आहे. त्यामुळे अशा चार्याला पशुधनही तोंड लावणार नाही. अजुन किती दिवस व किती पाऊस पडेल याचा अंदाज नसल्याने गहु, हरभरा, मसुर, वाटाणा अशा खरीप पिकाची लागवड लांबणार आहे. भाजीपाल्यालाही या अवकाळीचा फटका बसणार असुन भाजीपाला सडण्याचा व करपा पडण्याची शक्यता असल्याची भिती बेझे येथील शेतकरी बाळासाहेब आबाजी चव्हाण यांनी व्यक्त केली.
बागायती शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्षपिकाला सर्वाधिक फटका बसुन या पावसाने द्राक्षांचे शंभर टक्के नुकसान झाली असल्याची माहिती द्राक्ष उत्पादक राजाराम चव्हाण, नवनाथ रामदास बोडके यांनी दिली. इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महसूल विभाग व कृषी विभाग यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावे व शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी केली आहे. दिवसभर रिपरिप पाऊस, सर्वत्र धुक्याचे आच्छादन व वातावरणातील प्रचंड गारवा यामुळे विविध व्यवसायांवर परिणाम झाला आहे, एरव्ही आकाशात विहार करणारे पक्षी सुध्दा दिवसभर आडोशाला बसुन होते.