इगतपुरीनामा न्यूज, दि. २८
निसर्ग आणि ग्रामीण ढंगात असलेले साहित्य मानवी मनाला अधिक भावते. त्यातून व्यक्त होणारे भाव हे साहित्याची भव्य इमारत उभी करण्यास अधिक सक्षम आहेत असे प्रतिपादन २२ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यानी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. यावेळी जेष्ठ साहित्यिक पुंजाजी मालुंजकर, भाऊसाहेब खातळे, प्रा. पी. आर. भाबड, प्रा. देवीदास गिरी, रानकवी तुकाराम धांडे, रवींद्र मालुंजकर आदी उपस्थित होते.
श्री. शहाणे पुढे बोलतांना ते म्हणाले की, माणसाची भावप्रणाली बदलू लागली की संवेदनशीलता कमी होते. साहित्य हे साहित्यच असते. त्यात ग्रामीण आणि शहरी तसेच साहित्याचे विविध प्रकार असा दुजाभाव नसावा. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी आदिवासी नृत्याने साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. यावेळी चित्रपट व लघुपटातून व्यक्त होणारं साहित्य या विषयावर परिसंवाद झाला. यात कला दिग्दर्शक कृष्णा बेलगावकर, कवी आणि कलाकार राजेंद्र उगले, दत्ता अलगट, ज्ञानेश्वर गुळवे यांनी सहभाग घेतला. त्यानंतर कथाकथन घेण्यात आले. यात सप्तश्री माळी, पुंजाजी मालुंजकर, क्षमा गोवर्धने आदींनी सहभाग घेतला. त्यानंतर खुले कवी संमेलन पार पडले. ह्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. डी. पी. पवार होते. व्यासपीठावर मनोहर शहाणे, विलास गोवर्धने, पुंजाजी मालुंजकर, अशोक पवार, बाळासाहेब पलटने, रवींद्र पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रसिद्ध कवी सूत्रसंचालक रवींद्र मालुंजकर आणि राजेंद्र उगले यांनी केले.
कवी संमेलनात तुकाराम धांडे, प्रा. राज शेळके, पुंजाजी मालुंजकर, प्रशांत धिवंदे, शरद आडके, विद्या पाटील, रोहिणी चौधरी, शिवाजी क्षीरसागर, शरद मालुंजकर, श्रीराम तोकडे, प्रा. आर. डी. शिंदे, रूपचंद डगळे, देवीदास शिरसाठ, अशोक कुमावत, भाऊराव काळे, सत्यवान वारघडे, प्रा. देवीदास गिरी, संजय कान्हव, डॉ. बाळू घुटे यांनी सहभाग घेतला. यावर्षी ‘सर्वतीर्थ’ पुरस्कार जेष्ठ पत्रकार विश्वास देवकर यांना, ‘जीवनगौरव’ पुरस्कार इंजि. भाऊसाहेब खातळे, ‘ज्ञानसाधना’ पुरस्कार शिक्षक अनिल शिरसाठ, ‘ज्ञानदुत’पुरस्कार प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड, ‘काव्यरत्न’ पुरस्कार कमलाकर (आबा) देसले, ‘अक्षरदूत’ पुरस्कार पत्रकार रमेश पडवळ, ‘कलारत्न’ पुरस्कार कृष्णा बेलगावकर, ‘सामाजिक कृतज्ञता ‘पुरस्कार यमुताई अवकाळे यांना जेष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. शेवटी पसायदानाने संमेलनाचा समारोप करण्यात आला.