इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
दोन दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुगारवाडी ( कळमुस्ता ) गावांत बालकांना बिबट्याने जखमी केल्याची घटना घडली होती. यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली होती. ह्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरचे वन परिक्षेत्र अधिकारी राजेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी दीपक राजभोज वनरक्षक संतोष बोडके, मंगेश शेळके, रत्ना तूपलोंढे, शोभा वाघचौरे यांच्या पथकाने ह्या भागात पाहणी केली. जखमी बालकांच्या कुटुंबाला भेट देऊन वन विभाग तुमच्या सोबत असल्याचे सांगितले. बालकांच्या कुटुंबीयांनी यावेळी वन विभागाने केलेल्या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त करून दिलासा मिळाला असल्याची भावना व्यक्त केली.
बिबट्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालय त्र्यंबकेश्वर यांनी त्र्यंबकेश्वरचे वन परिक्षेत्र अधिकारी राजेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी दीपक राजभोज वनरक्षक संतोष बोडके, मंगेश शेळके, रत्ना तूपलोंढे, शोभा वाघचौरे यांनी दुगारवाडी ( कळमुस्ता ) परिसरात बिबट्याबाबत जनजागृती केली. या भागातील विविध ग्रामपंचायतीच्या सहकार्याने बिबट्या जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या माध्यमातून लोकांमध्ये असलेली बिबट्या बद्दलची भीती व गैरसमज दूर करण्यात आले आहेत.
बिबट्याने ऊस शेतीला आपला अधिवास बनवला आहे. उसातच तो आपले प्रजनन करत आहे. गावातील मोकाट कुत्रे, जनावरे, उसात सापडणारे मोर, वानर, डुक्कर, अश्या प्राण्यांवर तो आपली गुजराण करत आहे. मनुष्य हे बिबट्याचे अन्न नसल्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. पाळीव प्राण्यांसाठी बंदीस्त गोठा बनवणे व आपल्या पाळीव प्राण्यांना बिबट्यापासून सुरक्षित ठेवणे हा योग्य पर्याय आहे. मांजरकुळातील बिबट्याला पिंजऱ्यात पकडून दूर सोडल्यास काही दिवसांनी तो पुन्हा मूळ जागी परत येतो, अथवा त्याची जागा नवीन दुसरा बिबट्या घेत असतो. त्यामुळे लोकांनी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यासाठी वन विभागावर दबावआणू नये. नागरिकांनी गावातील परिसर स्वच्छ ठेवावा, आपल्या घराशेजारील झुडपे,तण, अडचण साफ करावी. गावात कचरा करू नये, घाणीमुळे डुकरे आणि कुत्री यांची संख्या वाढते. त्यामुळे बिबट्या त्यांच्याकडे आकर्षित होतो व मानव बिबट संघर्ष होण्याची शक्यता निर्माण होते. लोकांनी त्यांची गुरे, शेळ्या, मेंढ्या बंदिस्त ठेवावेत, गावच्या परिसरात पुरेशी लाइटची व्यवस्था करावी, रात्री शेतात जाताना टॉर्च व रेडिओचा वापर करावा, एकटे न जाता समूहाने जावे या सूचना देण्यात आल्या. या जनजागृती कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.