लोका सांगे ब्रह्मज्ञान !

लेखन – पुरुषोत्तम आवारे पाटील
दै. अजिंक्य भारत
संवाद – 989216228

परवा ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात द्वारली या गावात राहणार्‍या गजानन बुवा चिकनकर या 80 वर्षाच्या व्यक्तीला पोलिसांनी आळंदीवरून अटक केली. प्रकरण होते पत्नीला अमानुष मारहाण करताना व्हायरल झालेल्या एका चित्रफितीचे. सोशल मीडियावर ही घटना वेगाने व्हायरल झाल्यावर लोकांचा संताप अनावर झाला. लोकांचा दबाव पोलिसांवर वाढल्याने शेवटी त्यांनी स्वत:हून तक्रार दाखल करीत या गजानन बुवाला बेड्या ठोकल्या.

चार-पाच दिवसांपूर्वी अनेकांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर एक व्हिडीओ पाठविण्यात आला होता. त्यात एक म्हातारा वृद्ध महिलेला पाणी भरण्याच्या बकेटने अमानुष मारहाण करीत असल्याचे दिसते. वृद्ध महिला असहायपणे हा मार सहन करताना बघून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. त्यानंतर मात्र आपापल्या परीने चौकशी व्हायला सुरुवात झाली आणि समजले की ही घटना ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात द्वारली गावात घडली आहे.

पत्नीला मारहाण करणारे गजानन बुवा चिकनकर हे स्वत: गावातले मोठे अध्यात्मिक प्रस्थ आहेत. ते कीर्तन, प्रवचनकार म्हणून परिसरात ओळखले जातात. या घटनेचे मोबाइलवर खुद्द त्यांच्या नातवानेच चित्रण केले आहे. घरात चिकनकर यांचा दरारा असल्यामुळे त्यांच्यापुढे बोलायची कुणाची हिंमत होत नाही म्हणून अनेक वर्ष मुकाटपणे त्यांचे अत्याचार पत्नीला सहन करावे लागतात अशीही माहिती नंतर समोर आली आहे.
सोशल मीडियाचा दबाव आणि प्रभाव किती असू शकतो याचा पुन्हा एकदा या प्रकरणात अनुभव आला आहे. घरगुती हिंसा विरोधात कायदा होऊनही तक्रार करण्यासाठी कुणी पुढे येत नाही, त्यामुळे कायद्याचा अंमल कसा करावा, असा मोठा प्रश्न पोलिसांना पडतो. या प्रकरणात मात्र प्रत्यक्ष घटनाच कॅमेर्‍यात चित्रीत झाल्यामुळे हे गजानन बुवा त्यात अडकले आहेत.या घटनेच्या निमित्ताने वारकरी सांप्रदायातील संस्कार आणि प्रत्यक्षात वागणूक यावर सोशल मीडियावर उलटसुलट चर्चेला उधाण यायला सुरुवात झाली. काहींनी कीर्तन, प्रवचनकारांना ठोकून काढताना आरोपांचे फटकारे वारकरी सांप्रदायावर सुद्धा मारले आहेत. मुळात कुणावरही अन्याय करणारी शिकवण वारकरी सांप्रदायाच्या तत्त्वज्ञानात नाही. कुण्याही जिवाचा न घडो मत्सर असे म्हणणारा कोणताही विष्णूदास लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण असे वागू नये या विचारांचा स्वीकार करण्यावर भर देणारा असतो, मात्र उडदामाजी काळे गोरे निघतात तशातला हा प्रकार म्हणायला हवा.

काही मूठभर लोक आपापल्या सांप्रदायाला गालबोट लावत असतात असे सर्वत्र दिसते. ज्या डॉक्टरांना आपण देव समजतो, त्यातलाच एखादा शैतान निपजतो, कुणी बलात्कार करताना पकडला जातो. रक्षणाची जबाबदारी असणारा कुणी पोलिस स्त्रीची अब्रू घेताना आढळतो. तसाच हा प्रकार असतो. त्यामुळे अवघा सांप्रदाय किंवा ते क्षेत्र खराब असू शकत नाही.
लोकांना ज्ञानाचे धडे देताना केस पांढरे झालेल्या अनेकांना हा उपदेश आपल्यासाठी पण असतो याचे भान नसते. उपदेश करणार्‍याने स्वतः त्याचे आचरण करायला हवे. हे जो विसरला त्यासाठी संत तुकारामांनी आधी केले मग सांगितले ही शिकवण वारकरी सांप्रदायानेच देवून ठेवली आहे. त्याचा विसर दुदैवाने या क्षेत्रातल्या अनेक बुवांना सध्या पडलेला दिसतो. ज्ञानाच्या क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्ती समाजासाठी दीपस्तंभ म्हणून काम करीत असतात पण दिव्याखाली अंधार हा न्याय त्यांनाही लागू होतोय.

ज्ञानाच्या क्षेत्रात विशेषतः अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना अहंकाराची बाधा लवकर होते. ज्या गोष्टी समाजाने करू नये असे सांगत ज्यांची हयात जात असते ते स्वतः मात्र त्याच गोष्टीत गुरुफटून गेलेले असतात हे सभोवताली बघायला मिळते. दारूबंदीवर दिवसभर भाषणे ठोकणारे अनेक वक्ते जसे रात्र होताच श्रम परिहाराला बसतात तसेच सध्या सगळ्या क्षेत्रात होवू लागले आहे. उद्देशच अपवित्र झाल्यामुळे अण्णा हजारे यांना आपला भ्रष्टाचार निर्मूलन न्यास बरखास्त करावा लागला होता हे ठळक उदाहरण आपल्यापुढे आहे. गजानन बुवांच्या प्रकरणातही तेच झाले. लोकांना ब्रह्मज्ञान देताना स्वतःचे कोरडे पाषाण असे उघडे पडत असते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!