एकत्रित कुटुंब टिकवणारे “अंजन” काळाच्या पडद्याआड

स्व. अंजनाबाई काळे

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०

ज्याप्रमाणे कळस व ध्वजाशिवाय मंदिर पूर्णत्वास जात नाही. त्याप्रमाणे घरातील ज्येष्ठ व्यक्तीचे निधन होते तेव्हा घरातील आधार निखळला जातो. पिंपळगाव मोर येथील काळे परिवारातील ज्येष्ठ व्यक्ती श्रीमती अंजनाबाई काळे उर्फ ‘अंज्याई’ यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी देहावसान झाले. एकत्रित कुटुंबपद्धती अबाधित ठेवत त्यांनी खऱ्या अर्थाने घराला घरपण आणून ठेवले. गृहिणी ते ग्रामपंचायत सदस्य ते विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालिका अशी त्यांची राजकीय कारकीर्द संस्मरणीय ठरली.
पिंपळगाव मोर हेच माहेर व सासर असल्याने सासरी व माहेरी नेहमी हसत खेळत वातावरण ठेवून त्यांनी आनंदी वातावरण ठेवले. माहेरी ‘कदम’ व सासरी ‘काळे’ हे दोघंही परिवारात सलोखा ठेवण्यात त्या तरबेज होत्या. सन १९७२ साली पडलेल्या दुष्काळात आपल्या परिवारासह आपल्या तिघाही पाल्यांचे पालनपोषण तर केलेच पण गरजूंना सुद्धा जी शक्य असेल ती मदत केली. त्यांनी गरिबीतून हलाखीचे जीवन जगून परिवाराला शून्यातून उभे केले. आपल्या मुलांचे ऐन गरिबीत किमान मॅट्रिक पर्यंत शिक्षण पूर्ण केले. आज त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र महिंद्रा अँड महिंद्रा कारखान्यात गेल्या २५-३० वर्षांपासून कार्यरत आहेत तसेच दुसरे हाडाचे शेतकरी आहेत. अंजनाबाईचे सुपुत्र पंढरीनाथ काळे हे पिंपळगाव मोर विकास कार्यकारी संस्थेवर गेल्या ५ वर्षांपासून चेअरमन पदावर कार्यरत असून संस्थेचा पारदर्शक कारभार ते आजतागायत सांभाळत आहेत. अंजनाबाई यांनी प्रत्येक सुखदुःखाच्या प्रसंगी उभे राहून प्रत्येक क्षणी परिवाराला व गावातील व्यक्तींना खंबीर साथ दिली. अशा पवित्र असणाऱ्या अंजनाबाई आपल्यात नाहीत ह्यावर विश्वास बसत नाही. आज त्यांचा दशक्रिया विधी आहे.  अंजनाबाई यांच्या आत्म्यास ईश्वर सद्गती देवो..!

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!