पाडळी रेल्वेस्थानकात तिकीटगृह व प्रतिक्षागृहाची सुविधा देण्याची मागणी : उपसरपंच बाळासाहेब आमले यांचे रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन

इगतपुरीनामा न्यूज (प्रभाकर आवारी, मुकणे) दि. १२ :

इगतपुरी तालुक्यासह जिल्ह्यातील प्रवाशांना व कामगारांना राष्ट्रीय महामार्ग व गोंदे औद्योगिक वसाहत जवळ असल्याने सोयीचे व अधिक वर्दळ असणाऱ्या पाडळी रेल्वेस्थानकाची सुधारणा करून तिकीटगृह व प्रवासी प्रतिक्षागृहाची सुविधा उपलब्ध व्हावी तसेच इतर काही जलद गाड्यांनाही येथे थांबा मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे रेल्वेमंत्री नामदार रावसाहेब दानवे यांच्याकडे पाडळी देशमुखचे उपसरपंच बाळासाहेब आमले यांनी केली आहे.

नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाला लागून असल्याने नाशिक, पर्यटकांना व प्रवाशांना सोयीचे असणाऱ्या पाडळी रेल्वे स्थानकात वाढती गर्दी लक्षात घेता या स्थानकाची सुधारणा करून रेल्वेस्थानक व लोहमार्ग यातील उंची कमी करून सदर स्थानक हे गाडीच्या समांतर करण्यात यावे, तसेच येथे प्रवाशांसाठी प्रतिक्षागृह तसेच तिकीटगृहाची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. सद्य स्थितीत शटल व पॅसेंजर या दोनच गाड्यांना येथे थांबा आहे. महामार्ग जवळ असल्याने तसेच गोंदे औद्योगिक वसाहत जवळ असल्याने कंपनी कामगारांनाही या स्थानकाचा मोठा फायदा होणार आहे. रेल्वेस्थानकाची सुधारणा करण्याबरोबरच येथे प्रवासी प्रतिक्षागृह व तिकीटगृहाची सोय करून प्रवाशांच्या वर्दळीचा विचार करून येथे जलद गाड्यांनाही थांबा मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी पाडळी देशमुखचे उपसरपंच बाळासाहेब आमले यांच्यासह आदिवासी संघटनेचे युवा नेते तुकाराम वारघडे, दत्तु बोराडे हे उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!