इगतपुरी तालुक्यातील ३ ठिकाणे प्रभू श्रीरामाच्या सानिध्याने पावन : “असा” आहे रामायणकालीन पौराणिक इतिहास

नहि तद्भविता राष्ट्रं यत्र न रामो न भूपतिः ।
तद्वनं भविता राष्ट्रं यत्र रामो निवत्स्यति ॥
(- वाल्मिकी रामायण २/३७/२९)

‘श्रीराम जेथे नसेल, ते राष्ट्र राष्ट्रच राहणार नाही आणि जेथे राम असेल तो उजाड प्रदेश, वनवासी भागही राष्ट्र होईल.’ थोर तत्त्वज्ञ, चिंतक, तपस्वी वशिष्ठ ऋषींचे हे वाल्मिकी रामायणातील उदगार आहेत. राष्ट्रपुरुष प्रभू रामचंद्राचे अनन्य महात्म्य सार्थ, समर्पक व शाश्वत आहे. भगवान श्रीराम हे भारताचे ध्रुवतार्‍यासारखे अढळ सांस्कृतिक मानबिंदू आहेत. “राम-कृष्णांच्या दिव्य चरित्रांनी मंडित रामायणाच्या, महाभारताच्या रेशमी धाग्यांनीच भारतीय संस्कृतीचे महावस्त्र विणलेले आहे.” असे विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटलेले आहे. प्रभू श्रीराम हे भारतीय सांस्कृतिक एकता, एकात्मता, समरसता यांची अधिष्ठानस्वरूप परमनिधान आहेत. त्यांचा भारतीय जनमानसावर गेली शेकडो वर्षे विलक्षण प्रभाव आहे. इगतपुरी सारख्या अतिदुर्गम आदिवासी तालुक्याला परमपरमात्मा प्रभू श्रीराम यांचे पदस्पर्श झालेले असून हा तालुका पावन झालेला आहे. रामायणकालीन किष्किंधानगरी, भक्तराज जटायु, कामाक्षी माता ही तीन पवित्र ठिकाणे प्रभू श्रीरामाच्या पावन सानिध्याची प्रचिती देतात. रामजन्मभूमी अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरु आहे. ह्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील रामायण कालीन अतिप्राचीन स्थळांची माहिती समजून घेणे आवश्यक आहे.

पौराणिक आख्यायिका असलेल्या सर्वतीर्थ टाकेद येथे सर्वतीर्थांचे पवित्र तीर्थ असल्याने येथे संपुर्ण महाराष्ट्रातून फार मोठ्या संख्येने भाविक येतात. लाखो भाविकांच्या उपस्थिती असलेल्या महाशिवरात्रीच्या यात्रेला अनन्यसाधारण महत्व आहे. पंचवटी येथे प्रभू श्रीराम, लक्ष्मण व सितामाई रहात होते. एके दिवशी संधी साधून भिक्षेकरी साधूच्या वेशातील रावणाने सितामाईला उचलून लंकेच्या दिशेने मार्गक्रमण सूरू केले. सितामाईचा आकांत ऐकून रामभक्त पक्षीराज जटायूने सितामाईला सोडवण्याचा प्रयत्न केला. रावणाशी झालेल्या तुंबळ युद्धात जटायूला पंखविरहीत पडावे लागले. घायाळ स्थितीतही पक्षीराज जटायू रामनामाचा जप करू लागला. प्रभू श्रीराम व  लक्ष्मण सितामाईच्या शोधात तेथे आले. रामभक्त जटायूचे राम राम हे स्वर कानी पडले. जटायूच्या जवळ आल्यावर त्याने सर्व घटना श्रीरामांना सांगितली. प्रभू श्रीरामाने जटायूला जीवदान देत असल्याचे म्हटले. मात्र जटायूने नाही प्रभू, मी एक उत्कृष्ट सेवा करत मरत आहे. मी सुखाने मरतो, पण मला शेवटचा पाण्याचा घोट आपल्या पवित्र हस्ते पाजा. प्रभू श्रीराम यांनी अभिमंत्रित बाण मारून जगातील सर्व तीर्थ बोलावून सर्वतीर्थ ठिकाण निर्माण केले. जटायू महाराजांना मुक्ती देण्यासाठीच हे तीर्थ निर्माण केले. सर्वात शेवटी तीर्थांचा राजा प्रयागराज हे तीर्थ आले. त्यासाठी येथे स्वतंत्र कुंड आहे. याचा उल्लेख तुलसी रामायण, वाल्मिकी रामायणमध्ये आलेला आहे. सर्वतीर्थ टाकेदला प्रभू श्रीराम यांचा हा जाज्वल्य इतिहास लाभला आहे.

इगतपुरी तालुक्यातील पौराणिक वारसा असलेले कावनई सिंहस्थ कुंभमेळ्याचे आद्यस्थान आहे. प्रभू श्रीराम जटायूचा उद्धार करून दंडकारण्यात सीतेचा शोध घेत होते. त्यावेळी कैलास पर्वतावर शंकराचा ‘श्रीराम’ हा जप सुरू असतांना पार्वतीदेवी म्हणाली, जो राम आपल्या पत्नीचा सांभाळ करू शकत नाही. त्या रामाचे तुम्ही ध्यान का करता? त्यावर शंकर म्हणाले, की तू जो विचार करत आहेस तो चुकीचा आहे. तू रामाची परीक्षा घेऊ शकतेस. तेव्हा पार्वतीदेवी सीतारूपात श्रीरामाला मोहीत करू लागली. मात्र श्रीरामाने पार्वतीदेवीला ओळखून दंडवत घातले. तेव्हा पार्वतीदेवी प्रसन्न होऊन कैलास पर्वतावर परतू लागली. तेव्हा श्रीरामाने ‘माझ्यासाठी आपण येथे राहावे’ असा हट्ट धरला. तेव्हापासून पार्वतीमाता येथे राहिली. श्रीरामाची ‘काम इच्छा’ पाहण्यासाठी आलेल्या कामाक्षी मातेचे येथे मंदिर आहे. लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर संजीवनी बुटी आणण्यासाठी ह्या तीर्थावरुन जात असतांना हनुमानाने कालनेमी राक्षसाचा वध केला. म्हणून ह्या गावाचे नाव कावनई असे पडले. इथले कपिलधारा हे अतिप्राचीन तीर्थस्थान असून ह्याच तीर्थावर पहिला कुंभमेळा झाल्याची नोंद सापडते. येथे महादेवाचे पुरातन मंदिर, पाण्याचे २ कुंड असून ह्या तीर्थाचे स्नान केल्यावर गंगासागर तीर्थाचे पुण्य मिळते असा समज आहे. याच ठिकाणी प्रभू श्रीराम व भगवान शंकर यांची भेट, संत ज्ञानेश्वरांनी मृत ब्राह्मणाच्या मुलाला पाणी पाजून जिवंत केले. समर्थ रामदासांनी तेथेच शिवाजी महाराजांना उपदेश दिला. गजानन महाराजांनी तपस्या केली असे सांगितले जाते.

श्रीराम प्रभुच्या पवित्र सहवासाने इगतपुरी तालुक्यातील कुशेगाव अर्थात रामायणकालीन किष्किंधानगरी पावन झालेली आहे. येथे रामायण काळात प्रभू श्रीराम व वानरराज सुग्रीवाची भेट झाल्याचा इतिहास आहे. याच भागात सुग्रीव आणि वाली यांचे युद्ध झाल्याच्या आख्यायिका आहेत. इगतपुरी तालुक्यातील एकमेव असलेले पुरातन राममंदिर आणि श्रीरामभक्त शबरी माता मंदिर याच ठिकाणी आहे. येथे रामायण काळातील पंपासरोवर हे तीर्थ प्रसिद्ध आहे. ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामाने बाण मारून तीर्थाची निर्मिती केली असून या सरोवराचे पाणी कितीही उपसले तरी कमी होत नाही. रामनवमी पर्वाच्या काळात विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन ह्या भागात केले जाते. गाव परिसरात वानर मोठ्या प्रमाणावर असून हनुमान जन्मस्थळ अंजनेरी किल्याच्या पायथ्याशी किष्किंधानगरी वसलेली आहे.

अणुमाजी राम, रेणूमाजी राम। तृणी काष्ठी राम वर्ततसे 
बाहेरी अंतरी राम चराचरी। विश्वी विश्वकार व्यापलासे
रामे विण स्थळ रितेचि ते नाही। वर्ते सर्वाठायी राम माझा

Similar Posts

error: Content is protected !!