इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
इगतपुरी तालुक्यासाठी आनंदाच्या २ महत्वाच्या बातम्या आहेत. इगतपुरी तालुका संपूर्ण कोरोनामुक्त झाला असून आज अखेर कोरोना बाधितांची संख्या शून्यावर आली आहे. यासह दुसरी आनंदाची बातमी म्हणजे संपूर्ण तालुक्यात आजच २ लाख कोरोना लसीकरणाचे डोस पूर्ण झाले आहेत. यामध्ये ७५ टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. उर्वरित लोकांचे लसीकरण लवकरच पूर्ण करून इगतपुरी तालुक्यात १०० टक्के लसीकरणाचे उद्दीष्ठ पूर्णत्वाकडे आहे. कोरोनामुक्त तालुका आणि लसीकरणाचे २ लाख पूर्ण झालेले डोस हे यश इगतपुरी तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना समर्पित करतो असे इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी सांगितले.
इगतपुरी तालुक्यात पहिल्या कोरोना महामारीच्या लाटेत तुलनेने कमी रुग्ण होते. दुसऱ्या लाटेत दैनंदिन रुग्णसंख्येने चिंता उत्पन्न केली होती. यावेळी इगतपुरी तालुक्यातील आरोग्य यंत्रणेने दिवसरात्र काम करून कोरोना नियंत्रणात आणला. आज दिवस अखेर पर्यंत कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आल्याने तालुकावासीयांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. इगतपुरी तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सर्वांगीण प्रयत्न केल्याने नागरिकांनी आरोग्य विभागाचे आभार व्यक्त केले आहेत.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी इगतपुरी तालुक्यातील आरोग्य यंत्रणेने झपाटून काम केले. नागरिकांच्या प्रबोधनापासून त्यांना डोस देईपर्यंत अनेक अडचणींचा सामना आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला. यासह वाडीवऱ्हे आरोग्य केंद्राच्या आरोग्य पथकाचा अपघात सुद्धा झाला होता. सर्व अडचणींचा सामना करून अखेर आज इगतपुरी तालुक्याच्या आरोग्य विभागाने २ लाख कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा महत्वपूर्ण टप्पा पूर्ण केला. यामध्ये ७५ टक्के नागरिकांचा पहिला डोस समाविष्ट असून उर्वरित नागरिकांचे उद्दीष्ठ लवकरच पूर्ण केले जाणार आहे. संपूर्ण लसीकरण झाल्यावर कोरोनाचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त होत आहे.
इगतपुरीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली वाडीवऱ्हेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय माळी, भावली पथकाच्या डॉ. हेमलता देशमुख शितोळे, डॉ. सायली महाजन, नांदगाव सदोच्या डॉ. रोहिणी गांगुर्डे, डॉ. शाहू आवारी, काननवाडीचे डॉ. विश्वनाथ खतेले, डॉ. चित्रा वेढे, डॉ. वैशाली ठाकरे, काळूस्तेचे डॉ. जी. एस. काळे, डॉ. सोनाली कोळी, खेडचे डॉ. भगवंत पगार, डॉ. शंतनू म्हस्के, वैतरणाचे डॉ. बी. एच. लचके, डॉ. के. पी. गजभिये, बेलगाव कुऱ्हे डॉ. जी. पी. बांबळे, डॉ. देवयानी गडाख, धामणगावचे डॉ. संदीप वेढे, डॉ. आकाश विसपुते, डॉ. राजेश काटे यांच्यासह सर्व आरोग्य, अंगणवाडी, आशा वर्कर कर्मचाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे इगतपुरी तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
कोरोनामुक्ती आणि ७५ टक्के लसीकरण हे संपूर्ण यश तालुक्यातील तमाम वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचे सर्व सहकारी यांना समर्पित करतो. येत्या काळात सर्व उद्दीष्ठ पूर्ण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करू. नागरिकांनी बेफिकीर न राहता अजूनही कोरोनाचे नियम पाळून आम्हाला सहकार्य करावे.
- डॉ. एम. बी. देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी इगतपुरी