इगतपुरीनामा न्यूज, दि. १
समाज माध्यमांमध्ये कार्य करतांना अनेक घटकांशी संपर्क येतो. असे असले तरी बातमीपत्रात वास्तव मांडताना अनेक व्यक्ती दुरावल्या जातात. सामाजिक बांधिलकी ठेऊन या क्षेत्रात कार्य केल्यास आपण अनेक प्रश्न सोडवू शकतो. याचे समाधान फार मोठे असते असे प्रतिपादन झी चोवीस तास या चॅनलचे नाशिक जिल्ह्याचे प्रमुख प्रतिनिधी योगेश खरे यांनी केले. इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने प्रसारमाध्यमे आणि लेखन कौशल्य याविषयावरील कार्यशाळेत योगेश खरे बोलत होते.
याप्रसंगी झी चोवीस तासचे कॅमेरामन बबन सदगिर , उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, प्रा. डॉ. डी. डी. लोखंडे, लोकशाही न्यूज चॅनलचे इगतपुरी तालुका प्रतिनिधी विकास काजळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड हे होते. श्री. खरे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की आज मोठ्या प्रमाणात प्रसार माध्यमांना महत्त्व आले असून सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न या माध्यमातून मांडता येतात. प्रसारमाध्यमांची कार्यपद्धती व महत्त्व याप्रसंगी त्यांनी विशद केले. कॅमेरामन बबन सदगिर यांनी याप्रसंगी आपले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांच्या हस्ते करण्यात आला. प्राचार्य डॉ. भाबड यांनी आपल्या मनोगतात कार्यशाळेच्या आयोजनाचा हेतू विशद करुन विद्यार्थ्यांनी करिअरसाठी प्रसारमाध्यमांचे कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. गोपाळ लायरे यांनी केले.