सौर पथदीप बसवणारे जामुंडे हे नाशिक जिल्ह्यातील पहिलेच गाव
![](https://igatpurinama.in/wp-content/uploads/2023/02/wp-1676377695883.jpg)
इगतपुरीनामा न्यूज, दि. १४ – नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये आजही खऱ्या अर्थाने वीज पोहोचलेली नाही. त्यात आदिवासी वाड्यापाड्यांची दशा आणि दिशा सांगायला नको एवढी वाईट आहे. अशा भयानक परिस्थितीत जामुंडे ह्या विजेचा लपंडाव असणाऱ्या जामुंडे आदिवासी गावातील आदिवासी नागरिकांना काळ्याकुट्ट अंधारामध्ये कसेबसे दिवस काढावे लागत होते. हे गाव डोंगराळ आणि जंगली भागात असल्यामुळे रात्री साप, विंचू इत्यादी सरपटणारे विषारी प्राणी व बिबट्यासारख्या हिंस्र वन्यप्राण्यांच्या भीतीने रात्री घराबाहेर पडता येत नव्हते. रात्रीच्या अंधारात विद्यार्थ्यांना नीट अभ्यासही करता येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. ह्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत मानवेढे येथील सरपंच, उपसरपंच आणि गाव विकास समिती यांच्या प्रयत्नांनी स्वदेश फाऊंडेशनमार्फत जामुंडे गाव प्रकाशाने उजळून निघाले आहे. प्रत्येक घरात दर्जेदार सौर दिवे, प्रत्येक गल्ली बोळात मुबलक सौर पथदिवे बसवण्यात आले आहेत. यामुळे आदिवासी नागरिकांना जीवनात प्रकाशाची नवी वाट मिळाली असल्याचे उपसरपंच भाऊराव ज्ञानेश्वर भागडे यांनी सांगितले.
जामुंडे गावातील काळाकुट्ट अंधार दूर करण्यासाठी मानवेढे जामुंडे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच मनोहर वीर, उपसरपंच भाऊराव ज्ञानेश्वर भागडे व गाव विकास समिती यांनी स्वदेश फाउंडेशनकडे पाठपुरावा केला होता. सौरऊर्जेवर आधारित पथदीप आणि घरोघरी सौर ऊर्जा आधारित उपकरण बसवणारे जामुंडे हे गाव नाशिक जिल्ह्याच्या अतिदुर्गम आदिवासी भागातील पहिलेच गाव आहे. अतिदुर्गम भागातील आदिवासी नागरिक अंधारमय वातावरणात जगू नयेत म्हणून ग्रामपंचायत आणि स्वदेस फाउंडेशनने सौर ऊर्जेवरील उपक्रम राबवला. त्यामुळे येथील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. जामुंडे येथे घरोघरी सौर दिवे आणि चौकाचौकात सौर पथदीप लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला. गावकऱ्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी सर्व गावात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. कार्यक्रमावेळी मानवेढे जामुंडे ग्रामपंचायतीचे सरपंच मनोहर वीर, उपसरपंच भाऊराव ज्ञानेश्वर भागडे, स्वदेस आरोग्य विभाग डायरेक्टर डॉ. अजित कुमार सूडके, स्वदेस फाउंडेशन तालुका मॅनेजर योगेश तोथरे, स्वदेस फाउंडेशन आरोग्य विभाग डॉ. सचिन अहिरे, काशिनाथ आगिवले, हरिभाऊ डोके, भास्कर डोके, मोहन मनोहर, हिरामण डोके, संतू डोके, विलास डोके, नेमीनाथ डोके आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![](https://igatpurinama.in/wp-content/uploads/2023/02/wp-1676377719248-1024x461.jpg)