इगतपुरीनामा न्यूज, दि. २७
इगतपुरी तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गट आणि १० पंचायत समिती गणांच्या निवडणुकीसाठी काढण्यात येणारे राजकीय आरक्षण अद्यापही प्रलंबित आहे. यामुळे तालुक्यातील राजकीय कार्यकर्ते आणि नागतिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत संपर्क साधला असता राज्य निवडणूक आयोगाकडून गट गणांचे आरक्षण काढण्यासाठी सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. यासंदर्भात सूचना प्राप्त होताच नागरिकांसाठी प्रसिद्धीमाध्यमांद्वारे कळवण्यात येणार आहे. दरम्यान इगतपुरी तालुक्यात आरक्षणाबाबत रोजच अफवा पसरत असून प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीच्या आधी काढण्यात येणारे आरक्षण २ महिने लांबले आहे. त्यामुळे राज्य शासन निवडणुका घ्याल अनुत्सुक असल्याची चर्चा रंगली आहे. राज्यातील महानगरपालिकेसाठी आरक्षण प्रक्रिया प्रगतीपथावर असून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे आरक्षण लटकलेल्या अवस्थेत आहे. यामुळे अफवांना दुजोरा मिळत आहे.
इगतपुरी तालुक्यात शिरसाठे, खेड, नांदगाव सदो, घोटी, वाडीवऱ्हे हे जिल्हा परिषद गट असून शिरसाठे, खंबाळे, खेड, टाकेद, नांदगाव सदो, काळूस्ते, घोटी, मुंढेगाव, नांदगाव बुद्रुक, वाडीवऱ्हे हे पंचायत समिती गण आहेत. ह्या निवडणुकीसाठी तालुक्यातील सर्वच पक्षाच्या इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र अद्याप गट गणांचे राजकीय आरक्षण काढण्यात आलेले नाही. परंपरेप्रमाणे २ महिने उशिर झाला असूनही आरक्षण प्रक्रिया प्रलंबित आहे. रोजच सगळीकडे वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत. यामुळे राजकीय पदाधिकारी आणि महसुली अधिकाऱ्यांची चांगलीच डोकेदुखी झाली आहे. आरक्षण काढण्याची प्रक्रिया राबवताना सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनांप्रमाणे आरक्षण काढले जाणार असल्याने नागरिक संभ्रमात आहेत. अनेकांनी गुढग्याला बाशिंग बांधून भेटीगाठी सुद्धा केल्या आहेत. मात्र अद्याप आरक्षण नसल्याने संबंधितांचा चांगलाच पोपट होत आहे. संभाव्य आरक्षणाचा कोणाला फटका बसतो याची अनेकांना उत्सुकता असून उशिराच्या आरक्षणाची अनेकजण वाट पाहत आहे.
राज्य शासन जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर टाकणार असल्याची चांगलीच अफवा पसरली आहे. मनपा निवडणुकांसाठी आरक्षण प्रक्रिया प्रगतीपथावर असल्याने ह्याच आरक्षणाला विलंब का ? असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधला असता राज्य निवडणूक आयोगाकडून आरक्षण प्रक्रियेबाबत कोणत्याही सूचना अद्याप अप्राप्त असल्याचे सांगण्यात आले. आरक्षण प्रक्रिया आणि सोडत याबाबत नागरिकांना प्रसिद्धी माध्यमांद्वारे कळवण्यात येईल असेही सांगण्यात आले. दरम्यान इगतपुरी तालुक्यातील आरक्षणाबाबत कोणत्याही अफवांना काही अर्थ नसून राज्य निवडणूक यंत्रणा आदींनी आरक्षणाच्या संदर्भात निर्णय घेतल्यास नागरिकांना माहिती दिली जाणार आहे.